मुंबई : मुंबई विभागामध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा अकरावी प्रवेशासाठी तब्बल ५७ हजार १८० जागा वाढल्या आहेत. कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये प्रत्येकी १५ हजारांहून अधिक जागा वाढल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाची चिंता मिटली आहे. मुंबई विभागामध्ये विज्ञान शाखेमध्ये सर्वाधिक २० हजार ६७५ इतक्या जागा वाढल्या आहेत.

यंदापासून राज्यभरात अकरावी प्रवेश परीक्षा केंद्रीभूत पद्धतीने राबविण्यात येणार आहे. अकरावी प्रवेशासाठी यंद मुंबई विभागातून १२६५ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ४ लाख ६२ हजार २८० इतक्या जागांची नाेंद आहे. गतवर्षी मुंबई विभागामध्ये ४ लाख ५ हजार १०० इतक्या जागा होत्या. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मुंबई विभागातील जागांमध्ये ५७ हजार १८० इतक्या जागा वाढल्या आहेत.

यंदा मुंबई विभागामध्ये वाढलेल्या ५७ हजार १८० जागांपैकी सर्वाधिक २० हजार ६७५ जागा विज्ञान शाखेमध्ये वाढल्या आहेत. त्याखालोखाल वाणिज्य शाखेमध्ये १८ हजार ७६० जागा आणि कला शाखेमध्ये १७ हजार ७४५ जागा वाढल्या आहेत. त्यामुळे मुंबई विभागातील वाणिज्य शाखेच्या जागांची संख्या २ लाख २९ हजार ८७० इतकी झाली आहे. त्याखालोखाल विज्ञान शाखेच्या १ लाख ६० हजार ९९५ जागा आणि कला शाखेच्या ७१ हजार ४१५ जागा झाल्या आहेत. गतवर्षी मुंबई विभागामध्ये वाणिज्य शाखेमध्ये २ लाख ११ हजार ११० जागा होत्या, विज्ञान शाखेमध्ये १ लाख ४० हजार ३२० जागा आणि कला शाखेमध्ये ५३ हजार ६७० जागा होत्या.

जागांच्या आकडेवारीत गोंधळ

शिक्षण संचालनालयाकडून रविवारी जाहीर केलेल्या विभागानिहाय आकडेवारीमध्ये मुंबई विभागातील कला शाखेच्या जागा २२ हजार ९५५ इतक्या दाखविण्यात आल्या होत्या. मात्र जागांची बेरीज करताना, तसेच काही महाविद्यालयांकडून उशीरा नोंदणी झाल्याने जाहीर करण्यात आलेल्या जागा कमी दाखविण्यात आल्या होत्या. मात्र शिक्षण संचालनालयाने सर्व गोष्टींची दखल घेत सुधारित आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार मुंबई विभागात कला शाखेच्या जागांची संख्या २२ हजार ९५५ वरून ७१ हजार ४१५ इतकी झाली. त्यामुळे कला शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नसल्याची काळजी घेण्यात येईल, असे शिक्षण संचालनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

विषयनिहाय आकडेवारी

शाखा – २०२५ – २०२४

कला – ७१,४१५ – ५३६७०

वाणिज्य – २२९८७० – २११११०

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विज्ञान – १६०९९५ – १४०३२०