मुंबई : विद्यार्थ्यांना राज्यात ॲक्युपंक्चर अभ्यासक्रमाचे शास्त्रशुद्ध शिक्षण आणि नागरिकांना उत्तम व दर्जेदार उपचार मिळावे यासाठी महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेने राज्यात १२ नवीन ॲक्युपंक्चर महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. ही नवीन महाविद्यालये १ डिसेंबरपासून सुरू झाली असून, यापैकी अनेक महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

ॲक्युपंक्चर उपचार पद्धती शिकविणाऱ्या महाविद्यालयांचे पहिलेच वर्ष असल्याने रिक्त जागांवर प्रवेश दिला जात आहे. या नव्या १२ महाविद्यालयांमुळे देशात मान्यताप्राप्त पदवी व पदविका अभ्यासक्रम सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे.

आणखी वाचा-पोलीस निरीक्षक मुंबईत परतले, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई बाहेर झाली होती बदली

या अभ्यासक्रमाला केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून मान्यता मिळाली आहे. विद्यापीठाकडून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या मान्यतेसाठी पुढील काही महिन्यांमध्ये प्रयत्न करण्यात येतील. पदव्युत्तर अभ्यासक्रमही लवकर सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती परिषदेतील अधिकाऱ्याने दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६०० जागा उपलब्ध

महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेने महाराष्ट्र ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती अधिनियम २०१५ अंतर्गत फेब्रुवारी २०२३ मध्ये राज्यात ॲक्युपंक्चर महाविद्यालये सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. राज्यातील ५० संस्थांनी ॲक्युपंक्चर महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्रतिसाद दिला होता. त्यापैकी निवड केलेल्या १२ संस्थांना परिषदेने मान्यता दिली. प्रत्येक महाविद्यालयांत ५० जागांना मान्यता दिली आहे. यामुळे राज्यात ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीच्या ६०० जागा उपलब्ध झाल्या आहेत.