कुलदीप घायवट, लोकसत्ता
मुंबई : सुट्टीच्या दिवसात नियमित आणि सुट्टीकालीन प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेवरून २४ विशेष वातानुकूलित रेल्वेगाड्या चालवण्यात येतील. दिवाळी, छटपूजेच्या सुट्टीच्या कालावधीत या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळेल.
सीएसएमटी ते नागपूर द्विसाप्ताहिक सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडीच्या २० फेऱ्या होत्या. गाडी क्रमांक ०२१३९ अतिजलद विशेष रेल्वेगाडी सीएसएमटी येथून १९ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत सोमवारी आणि गुरुवारी रात्री १२.२० वाजता सुटेल आणि त्याचदिवशी दुपारी ३.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०२१४० अतिजलद विशेष रेल्वेगाडी २१ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत मंगळवारी आणि शनिवारी दुपारी १.३० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा असेल. या गाडीला १६ तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी क्लास आणि दोन जनरेटर व्हॅन असतील. या रेल्वेचे तिकीट आरक्षण सुरू झाले असून सर्व प्रवासी आरक्षण केंद्र आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू आहे.
आणखी वाचा-पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर एका तासाचा ब्लॉक घेण्यात येणार!
एलटीटी ते मंगळुरू साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या १४ फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०११८५ रेल्वेगाडी एलटीटी येथून २० ऑक्टोबर ते १ डिसेंबर दर शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.०५ वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल. गाडी क्रमांक ०११८६ रेल्वेगाडी २१ ऑक्टोबर ते २ डिसेंबर दरम्यान दर शनिवारी मंगळुरु जंक्शन येथे सायंकाळी ६.४५ वाजता सुटेल आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी दुपारी २.२५ वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड, कुंडुरा रोड , उडुपी, मुल्की, सुरथकल आणि ठोकूर येथे थांबा असेल.
आणखी वाचा-मुंबईत देहव्यापारासाठी १४ वर्षीय मुलीचे अपहरण, पोलिसांच्या सतर्कतेमुळे…
छपरा-एलटीटी-सिवान दरम्यान १२ फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०५०६३ छपरा- एलटीटी- सिवान वातानुकूलित साप्ताहिक अतिजलद विशेष रेल्वेगाडी २० ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान दर शुक्रवारी धावेल. सायंकाळी ४.१५ छपरा येथून सुटेल आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२५ वाजता पोहचेल. गाडी क्रमांक ०५०६४ वातानुकूलित विशेष एलटीटी येथून २२ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबरपर्यंत रविवारी दुपारी १२.४५ वाजता सुटेल आणि सिवान येथे दुसऱ्या दिवशी रात्री ३.१५ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला सिवान, देवरिया सदर, गोरखपूर जंक्शन, खलीलाबाद, बस्ती, गोंडा, बादशहानगर, ऐशबाग, कानपूर सेंट्रल, भारवा सुमेरपूर, रागौल, बांदा, चित्रकूट धाम, सतना, कटनी, जबलपूर, इटारसी, भुसावळ, नाशिक रोड आणि कल्याण येथे थांबा असेल. या रेल्वेगाडीला २० तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी क्लास आणि २ जनरेटर कार असे एकूण २२ एलएचबी डबे असतील. या रेल्वेगाडीचे आरक्षण विशेष शुल्कासह १६ ऑक्टोबर रोजी सर्व प्रवासी आरक्षण केंद्रावर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होईल.