मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळांचे मानांकन नुकतेच मिळाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व गिर्यारोहण संस्थांची शिखर संघटना असलेल्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे ‘राज्यस्तरीय किल्ले बांधणी स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे.

युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळांचे मानांकन मिळालेल्या १२ किल्ल्यांची प्रतिकृती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना साकारावी लागणार आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या विविध जिल्हा संघटनांमार्फत महाराष्ट्राच्या विविध भागातील प्रमुख शहरांमध्ये १७ ते २३ ऑक्टोबर या कालावधीमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘मराठा मिलिट्री लँडस्केप्स ऑफ इंडिया’ म्हणून ज्या किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळांचे मानांकन प्राप्त झाले आहे. त्या किल्ल्यांची भौगोलिक रचना आणि किल्ल्यांचे ऐतिहासिक व सामारिक महत्त्व सर्वांना समजावे व समाजामध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी सांगितले. ही स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आली असून, विजेत्यांना आकर्षक व उपयुक्त अशी पारितोषिके, ढाल व प्रशस्तिपत्रक अशी बक्षीसे महासंघाकडून देण्यात येणार आहेत.

स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे. या स्पर्धेचे प्रमुख समन्वयक म्हणून महासंघातर्फे राहुल मेश्राम व डॉ. राहुल वारंगे हे काम पाहत असून जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संपर्क : राहुल मेश्राम ९८३३३९४०४७ व डॉ. राहुल वारंगे ९४२२६९२१८७. गुगलअर्ज लिंक: https://forms.gle/6pD24KHndLAMi6Yd8