Elphinstone Bridge News: मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा १२५ वर्ष जुना असलेला ब्रिटिशकालीन एलफिन्स्टन पूल फेब्रुवारीच्या अखेरीस पाडला जाणार आहे. एमएमआरडीएने हा पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पूल बांधण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा काळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढील काही काळ मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू शकते. दक्षिण मुंबईतील दादर येथील टिळक पूल आणि लोअर परळ येथे झालेल्या डिलाईल रोड पूलाला समांतर असलेला हा पूल पाडल्यानंतर या दोन पूलावर वाहतुकीचा ताण वाढू शकतो. सायन पूल आधीच बंद असल्यामुळे वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे.

सांताक्रूझ-चेंबूर पूलासारखी संरचनेप्रमाणे याठिकाणी डबल डेकर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. खालचा पूल पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा असेल तर वरचा मार्ग शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूला जोडला जाणार आहे. एमएमआरडीएने ४.५ किमीचा उन्नत मार्ग बांधण्याचा प्रस्ताव तयार केला असून या पूलामुळे अटल सेतूवरील वाहनांना थेट वरळी किंवा दक्षिण मुंबई आणि वांद्र्याच्या दिशेने प्रवास करणे सोपे जाणार आहे.

दरम्यान एलफिन्स्टन पूल आताच पाडू नये, अशी मागणी शिवसेनेचे (ठाकरे) नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एलफिन्स्टन पूल पाडण्याचे काम पुढे ढकलण्यात यावे, अशी मागणी कालच एमएमआरडीएकडे केली आहे. बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार असून पूल पाडल्यास हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसू शकतो. सध्या सायन पूल नसल्यामुळे वाहतुकीचा सर्व भार टिळक आणि डिलाईल रोड पूलावर येईल. एमएमआरडीएने नागरिकांना आधी सूचना देणारे पत्रक जाहीर करावे. तसेच वाहतूक पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेशी समन्वय साधून वाहतूक सुरळीत कशी राहिल, हे सुनिश्चित करावे. एमएमआरडीए या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देईल, अशी अपेक्षा आहे.”