मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांच्या समस्येमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, महानगरपालिकेकडे आतापर्यंत १३ हजार तक्रारी आल्या असून सर्वाधिक तक्रारी भांडूप भागातून आल्या आहेत. प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी १२ हजारांहून अधिक तक्रारींचे पालिकेने निवारण केले आहे. मात्र, तरीही मुंबईतील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचे दिसते आहे. घाटकोपर, अंधेरी, बोरिवली, कुर्ला, शीव, धारावी आदी विविध भागांमधील नागरिकांचा प्रवास खड्ड्यांमुळे त्रासदायक झाला आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबईतील रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत. महानगरपालिकेतर्फे खड्डे बुजविण्यासाठी विविध प्रयत्न केले जात असेल तरीही अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचे दिसत आहे. कुर्ला बस आगार, वांद्रे बस आगार, परळ रेल्वे स्थानक परिसर, कलिना – कुर्ला रोड, घाटकोपर – मानखुर्द जोडरस्ता, नानाचौक, पश्चिम द्रुतगती मार्ग, बोरिवली, मालाड आदी आदी विविध ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांना नाहक त्रास सोसत प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, रस्त्यांवर होणाऱ्या खड्ड्यांची जलद गतीने दुरुस्ती करण्यासाठी महानगरपालिकेने ‘पॉटहोल क्विकफिक्स’ मोबाईल अॅप सुरू केले आहे. बहुतांश तक्रारी या ॲपद्वारे करण्यात आल्या असून व्हॉट्सॲप, ट्विटरवरूनही तक्रार करण्याची सेवा पालिकेने सुरू केली आहे.
महापालिकेकडे नागरिकांकडून १३ हजार ३४८ तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी १२ हजार ७१० तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. महिन्याभरात ३१५ खड्ड्यांच्या तक्रारी पालिकेकडे करण्यात आल्या आहेत. भांडुपमधून सर्वाधिक तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या असून त्यापैकी २०५१ तक्रारींचे पालिकेने निवारण केले आहे. हजारो खड्डे बुजवूनही अनेक रस्त्यांवर खड्डे दिसत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.पावसाळा संपत आला, तरीही अनेक रस्त्यांची अद्यापही दुरुस्ती झालेली नाही. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम राबवली होती. मात्र, त्याचा परिणाम झाल्याचे दिसत नाही.
वाहतूक कोंडी
शहराच्या मध्यवर्ती भागांत रस्त्यावर पसरलेले गणेशोत्सवाचे मंडप आणि खड्ड्यांनी भरलेले रस्ते यांमुळे शहरभर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. विशेषत उपनगरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या अधिकच भेडसावते आहे.