मुंबई: मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या सखोल स्वच्छता अभियानांतर्गत मुंबईतील प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील २६ ठिकाणच्या प्रार्थनास्थळांची स्वच्छता करण्यात आली. यातून सुमारे १४ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तसेच, ९ टन कचरा आणि ९ टन टाकाऊ वस्तूही गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. मुंबईला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहीम हाती घेतली होती.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे दर आठवड्याला मुंबईतील विविध भागांची स्वच्छता करण्यात येत होती. मुंबईतील लहान-मोठे रस्ते, गल्लीबोळांची स्वच्छता, शासकीय, महानगरपालिका व खासगी रूग्णालये, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग, क्रीडांगणे, शाळा आदींची स्वच्छता केल्यांनतर आता धार्मिकस्थळांची स्वच्छता पालिकेने हाती घेतली आहे.
मुंबईतील विविध स्वयंसेवी संस्था, नागरिक तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आदींच्या सामूहिक प्रयत्नांतून २८ एप्रिल ते ९ मेदरम्यान दररोज सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत संपूर्ण मुंबईत ही मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी मुंबईतील २६ प्रार्थनास्थळांच्या ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. त्यातून सुमारे १४ टन कचरा, ९.६ टन राडारोडा आणि ९ टन टाकाऊ वस्तूंचे संकलन करण्यात आले. तसेच त्याची विल्हेवाटही लावण्यात आली.
महापालिकेचे ८०१ स्वच्छता कर्मचारी, ५६ स्वयंसेवक यांनी ६० अद्ययावत यंत्रांच्या साहाय्याने स्वच्छाता केली.मुंबईत यापूर्वी ‘सखोल स्वच्छता मोहीम’ राबविण्यात आली होती. तसेच, १७ ते २२ मार्च या कालावधीत रोज रात्री १० ते सकाळी ६ वाजेदरम्यान पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांची व्यापक स्वच्छता करण्यात आली होती. १ ते ४ एप्रिल या कालावधीत मुंबईतील प्रमुख क्रीडांगणांमध्ये आणि त्यानंतर, ७ एप्रिलपासून मुंबईतील शाळांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.
संबंधित धार्मिक स्थळाशी निगडित विश्वस्त आणि अन्य प्राधिकृतांशी समन्वय साधून त्या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे. प्रामुख्याने धार्मिक स्थळाभोवतालचा परिसर, वाहनतळ, घनकचरा संकलनाचे ठिकाण, पदपथ आदींची यांत्रिक तसेच स्वच्छता कर्मचारी यांच्या सहाय्याने व्यापक स्वच्छता करण्यात येत असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.