महिला सबलीकरण आणि संरक्षणासाठी सरकार व प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्याच्या घोषणा होत असल्या, तरी प्रत्यक्षात परिस्थिती अद्याप सुधारली नसल्याचंच चित्र दिसून येत आहे. बलात्काराच्या घटना अद्याप कमी न झाल्यामुळे परिस्थिती सुधारली नसल्याच्या दाव्याला बळच मिळत आहे. मुंबईजवळील मीरा-भाइंदर परिसरात नुकत्याच समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे महिला संरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. विशेष म्हणजे हे सर्व दुष्कृत्य करण्यासाठी आरोपींना एका महिलेनंच मदत केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तीन जणांना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
एएनआयनं पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, हा प्रकार मीरा-भाइंदरमध्ये घडला. आरोपी व पीडित १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी एकाच परिसरात वास्तव्यास आहेत. सदर आरोपी महिलेचं नाव पूजा यादव असं असून तिने पीडित मुलीला त्यातील एक आरोपी श्रीकांत यादव याच्या घरी खोटं कारण सांगून बोलवलं. तिथे पीडित मुलीला धमकावून तिच्यावर श्रीकांत यादवनं बलात्कार केला.
काही दिवसांनी पुन्हा एकदा पूजा यादव पीडित मुलीला धमकावून जबरदस्तीने तिसरा आरोपी मिलन यादव याच्या घरी घेऊन गेली. तिथे या अल्पवयीन मुलीवर वारंवार अनेक वेळा बलात्कार करण्यात आला. शिवाय, आरोपींनी पीडित मुलीला कुणाला काही न सांगण्याबाबत धमकावलंही होतं.
मुलीनं हिंमत दाखवली, पोलिसात तक्रार केली!
दरम्यान, आरोपींच्या धमकावण्याला भीक न घालता पीडित मुलीनं काशिमीरा पोलीस स्थानकात तक्रार करून हा सगळा प्रकार सांगितला. या मुलीच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात कलम ३७६, ३७६ (२), १०९ व ११४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पीडिता अल्पवयीन असल्यामुळे आरोपींना पोक्सो कायद्याची कलमंही लावण्यात आली आहेत. दरम्यान, आरोपी महिलेनं अशाच प्रकारे इतर मुली किंवा महिलांनाही लक्ष्य केलं आहे का? यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत.
