या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संदीप आचार्य

मधुमेहजन्य नेत्रपटलविकारामुळे (डायबेटिक रेटिनोपॅथी) दोन लाख २० हजार लोकांना अंधत्व आले असून, आजमितीस जवळपास २२ लाख लोकांना अंधत्वाचा धोका असल्याचे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आगामी दशकात भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी बनणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. महाराष्ट्राच्या बारा कोटी लोकसंख्येत एक कोटीहून अधिक लोकांना मधुमेह आहे. मधुमेहामुळे हृदयविकार, मूत्रपिंड विकार, मज्जासंस्थांचे विकार तसेच नेत्रपटालावर परिणाम होऊन अंधत्व येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक व नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.

महाराष्ट्रात आजघडीला सुमारे २२ लाख लोकांना डायबेटिक रेटिनोपॅथीचा आजार असल्याचे सांगून डॉ. लहाने म्हणाले, यातील अनेकांना या आजाराची नेमकी कल्पनाही नाही किंवा त्यांना आजाराचे गांभीर्य जाणवताना दिसत नाही.

केंद्र शासानाने असंसर्गजन्य आजारांमध्ये मधुमेहाच्या अटकावाला प्राधान्य दिले असून त्यासाठी व्यापक जनजागृती करण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत. मात्र डायबेटिक रेटिनोपॅथीची चाचणी करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री आजघडीला मुंबईतील जे.जे. रुग्णालय, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच उपलब्ध आहे. याशिवाय आरोग्य विभागाच्या रुग्णालयात अथवा अन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही यंत्रणा नसल्यामुळे मधुमेहजन्य नेत्रपटलविकाराची नेमकी तीव्रता व त्यावरील उपचाराबाबत रुग्ण अनभिज्ञ आहेत.

औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयात दोन कोटी रुपये खर्चून डायबेटिक रेटिनोपॅथीची चाचणी करणारे उपकरण घेण्यात आले असले तरी गेले काही वर्षे ते वापराविना बंद अवस्थेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्रात मधुमेहाचे जवळपास ७० टक्के रुग्ण हे शहरी भागातील असले तरी गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातही मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत असून ती ३० टक्के एवढी झाल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले.

लक्षणे

* डायबेटिक रेटिनोपॅथीच्या आजारात पहिल्या टप्प्यात आजार असल्याचे रुग्णांना समजत नाही. किंवा तशी स्पष्ट लक्षणेही दिसत नाहीत.

* हा आजार दृष्टिपटलाच्या मध्यापर्यंत पोहोचतो तेव्हा रुग्णाला धूसर दिसू लागते व त्यापुढच्या टप्प्यात नेत्रपटलाच्यापुढे रक्सस्राव झाल्यास काळे डाग दिसू लागतात. तोपर्यंत बऱ्यापैकी उशीर झालेला असतो.

* यातील महत्त्वाचा भाग आजार झाल्यावर तो पूर्णपणे बरा होऊन दृष्टी परत येत नसल्यामुळे प्रतिबंध हाच पर्याय असल्याचे ठाण्यातील रामकृष्ण नेत्रालयाचे प्रमुख डॉ. नितीन देशपांडे यांनी सांगितले.

उपाय

यावर उपाय म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांनी दर सहा महिन्यांनी रेटिनाची तपासणी करणे आवश्यक असल्याचे डॉ. देशपांडे म्हणाले. मुळात मधुमेह आटोक्यात ठेवल्यास हा आजार नियंत्रणात ठेवता येणे शक्य आहे. त्यासाठी योग्य व्यायाम व संतुलित आहार घेणे गरजेचे असून मधुमेहाच्या रुग्णांनी नियमितपणे डोळ्याची तपासणी करणे गरजेचे असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 22 lakh people in the state at risk of blindness due to diabetes abn
First published on: 25-11-2019 at 00:40 IST