घरांची किंमत ठरवताना बांधकाम खर्चावरील व्याजाच्या रकमेत साडेचार टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय गुरुवारी म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे ‘म्हाडा’च्या घरांच्या किमती आता आटोक्यात येणार असून सध्याच्या सोडतीमधील घरांची किंमत सुमारे ७० हजार ते अडीच लाखांनी स्वस्त होणार आहे.
‘म्हाडा’च्या घरांच्या किमतीबाबतची ओरड लक्षात घेऊन घरांच्या किमती ठरवण्याच्या सूत्राचा फेरविचार गुरुवारी झाला. घरांची किंमत ठरवताना बांधकाम खर्चावर वार्षिक १४.५ टक्के दराने व्याज आकारले जाते. त्याऐवजी हा व्याजदर कमी केल्यास घराची किंमत आपोआपच कमी होईल असा विचार झाला आणि व्याजाचा दर १४.५ टक्क्यांऐवजी दहा टक्के करण्यावर सहमती झाली. या निर्णयाचा लाभ सध्या सुरू असलेल्या सोडतीसही देण्याचे ठरले. यंदा मुंबईतील ८१४ तर विरार आणि वेंगुर्ला येथील एकूण १८२७ अशा २६४१ घरांसाठी सोडत काढण्यात आली असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील घरांची किंमत १६ लाख २६ हजार ५०० पासून सुरू होते. तर दहिसर येथील उच्च उत्पन्न गटातील घरांची किंमत तब्बल ८० लाख ९८ हजार ५०० रुपये आहे. कोकण मंडळाच्या घरांची किंमत ११ लाख ८५ हजारांपासून ते ५० लाख २१ हजार ६१४ रुपयांपर्यंत आहे. व्याजदर १० टक्के होणार असल्याने म्हाडाची घरे स्वस्त होणार आहेत.
घरांचा पाऊस : मालवणीत २३ हेक्टरवरील गायकवाड नगर वसाहतीतील २२ हेक्टर जागेवर ‘म्हाडा’ पुनर्विकास करणार आहे. त्यामुळे २५०० रहिवाशांच्या पुनर्वसनानंतर ‘म्हाडा’ला चार ते सहा हजार घरे उपलब्ध होतील. ती पोलिसांची गृहनिर्माण वसाहत आणि सर्वसामान्यांसाठी सोडतीद्वारे विकली जातील.