मुंबई : रस्त्यावर बंद पडलेले वाहन तपासण्यासाठी खाली उतरलेल्या ४० वर्षीय व्यक्तीला मागून येणाऱ्या मोटारगाडीने सोमवारी धडक दिली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. तेजस बळीराम बागुल (४०) असे मृत चालकाचे नाव असून तो मालवाहू वाहनातून छापखान्यात कागदाची ने-आण करायचा. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी तरुणाला धडक देणाऱ्या मोटारगाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, मूळचा रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील रहिवासी असलेला तेजस कुटुंबासह विद्याविहार येथे भाडे तत्त्वावरील घरात राहत होता. तो कांदिवली येथील एका छापखान्यात कागद वितरणाचे काम करीत होता. तो मालवाहू वाहन चालवायचा. नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटेच्या सुमारास कांदिवली येथील छापखान्यातून वाहनाने कागद वितरणासाठी नवी मुंबईच्या खारघर व कामोठे येथे निघाला होता. पहाटे ४ च्या सुमारास त्याचे वाहन शीव – पनवेल महामार्गावरील मानखुर्द जकात नाक्याजवळ बंद पडले. तेजसने वाहनाची पार्किंग लाईट सुरू केली आणि गाडीतून खाली उतरून बंद पडलेले वाहन पाहात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मोटारगाडीने त्याला जोरात धडक दिली. या अपघातात तेजस गंभीर जखमी झाला.
अपघाताचा प्रत्यक्षदर्शी रिक्षाचालक राजेश नाडर याने जखमी अवस्थेतील तेजसला रिक्षातूनन जकात नाका येथे तैनात असलेल्या पोलीसांकडे नेले. पोलिसांनी तातडीने त्याला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी तुषारच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने मोटरगाडीचा क्रमांक मिळवून पोलिसांनी चालक साईरूल अल्लाउद्दीन इस्लाम याला ताब्यात घेण्यात आले आहे. इस्लाम हा नवी मुंबईतील रहिवासी आहे.