मुंबई : एकेकाळी मुंबई, ठाणे पट्टय़ातील स्थानिक मच्छीमारांसाठी मासे मिळण्याचे हमखास ठिकाण असलेल्या खाडय़ा प्रदूषणामुळे नाल्यात रूपांतरित होत आहेत. या प्रदूषणामुळे  खाडय़ांतील ४८  मत्स्य प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून चिंबोरी, कालवे, मांदेली या मासळींचा त्यात समावेश आहे. या खाडय़ांमध्ये  १९९० या वर्षांपेक्षा ३० ते ४० टक्के मासळी उपलब्ध असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

 खाडीत आढळणारे मासे विशिष्ट पद्धतीचे असतात. हे मासे छोटय़ा स्वरूपाचे असून ते प्रामुख्याने किनाऱ्याजवळ सापडतात. मात्र, खाडी किनाऱ्यावरील वाढत्या प्रदूषणाचा परिणाम तेथे आढळणाऱ्या मत्स्य जातीवर होत आहे. एका अभ्यासानुसार मुंबईतील खाडी क्षेत्रातील जवळपास ४८ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गार आहेत़  मुंबई, ठाणे, नवी मुंबई ही प्रामुख्याने खाडीची क्षेत्रे आहेत.  १९९० नंतर सुरू झालेली विकासकामे आणि सीआरझेड कायद्यानुसार ५०० मीटपर्यंत बांधकामांवर असलेली बंधने शिथिल झाल्याने त्याचा परिणाम झाला आहे.

हेही वाचा >>>मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा! फडणवीस यांचे मराठा आंदोलकांना आवाहनच  जरांगे यांचे शिंदे यांना निमंत्रण

पर्यावरण अभ्यासकांच्या मते प्रदूषण पातळीत मोठी वाढ झाली आहे. माशांच्या अंडी देण्याची ठिकाणे चिखल आणि रासायनिक कचऱ्याने भरलेल्या आहेत. त्यामुळे संवेदनशील असलेले मासे तेथे अंडी घालत नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून खाडीत आढळून येणाऱ्या अनेक मत्स्य प्रजाती कायमस्वरूपी नष्ट होणार आहेत. 

संकटात असलेल्या प्रजाती..

शिरसई, चिंबोरी, मुठे, तेल्या निवटा, खवली, काचणी, सुड्डा, हेसाळ, चिलोकटी, टोळके, मांदेली, कोत्या, टोळ, हरणटोळ, मांगीन, पिळसा, वरा, तेंडली, भिलजे, चांदवा, घोया, चिवनी, गोदीर, कर्ली, येकरू, सर माकली, हैद, मुड्डा, ताम,खरबी, केड्डी, जिताडा, करपाली, सफेद पातळी कोळंबी, पोचे, कोलीम(जवळा), खरपी चिंबोरा, खुबे, शिवल्या, कालवे, पालक आणि ढोमे या माशांच्या प्रजाती पूर्णत: नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रदूषण निर्माण करणाऱ्या प्रदूषकांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच गाळ काढण्याच्या दिशेने पावले उचलली पाहिजेत. सीआरझेड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच सीआरझेड क्षेत्रात कोणत्याही प्रकल्पाला परवानगी देऊ नये. – नंदकुमार पवार, अध्यक्ष, लघु पारंपरिक मत्स्य कामगार संघटना