मुंबई : पावसाची संततधार सुरूच असल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा दिवसभर कोलमडली आहे. लांबपल्ल्याच्या ७ गाड्या रद्द करण्यात आल्या असून १६ गाड्यांचे मार्ग बंद करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून संध्याकाळी वांद्रा, गोरेगाव हार्बर सुरू करण्यात आली असली तरी या गाड्या विलंबाने धावत आहेत. मिठी नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने सीएसएमटी ठाणे, मानखुर्द लोकल बंद करण्यात आल्या आहेत. कुर्ला, शीव, मानखुर्द, गोवंडी आदी स्थानकांतील रुळांवर १६ ते १७ इंच पाणी साचल्याने त्या मार्गावरील रेल्वे वाहतुकही बंद आहे.
मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने सीएसएमटी – ठाणे, मानखुर्द लोकल बंद करण्यात आल्या आहेत. मिठी नदीतील पाण्याची पातळी ३.६ मीटर एवढी झाली आहे. त्यामुळे लोकल सेवा बंद ठेवण्यात आल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले. कुर्ला, शीव, मानखुर्द, गोवंडी आदी स्थानकांतील रुळांवर १६ ते १७ इंच पाणी साचले आहे. एवढ्या पाण्यात लोकल चालविणे शक्य नसल्याने रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे, अशी माहिती नीला यांनी दिली.
लांबपल्ल्यांच्या ७ गाड्या रद्द, १६ गाड्यांचे मार्ग बदलले
रेल्वे रूळांवर पाणी साचल्याने लांबपल्ल्याच्या गाड्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले आहेत. त्यात १६ गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. मुंबई – पुणे दरम्यान धावणाऱ्या सात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पाच रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यात ३ रेल्वे गाड्या पुणे स्थानकातून, ३ रेल्वे गाड्या पनवेल स्थानकातून आणि एक गाडी नाशिक स्थानकातून सोडण्यात येत आहे.
सीएसटी- गोरेगाव हार्बर सेवा सुरू
हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वांद्रा, गोरेगाव लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. ठाणे, कल्याण, कसार, कर्जत सेवा शटल स्वरूपात सुरू आहे. ठाण्याहून वाशी ट्रान्सहार्बर, मानखुर्द – पनवेल हार्बर, बेलापूर – उरण सेवा सुरू आहे. पालिकेतर्फे रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना पाणी, चहा, बिस्टीक आणि नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवाशांच्या सोयीसाठी मदतकक्ष उभारण्यात आला होता.
पश्चिम रेल्वे विलंबाने, वसई-विरार सेवा बाधित
पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवा सुरू असल्या तरी त्या दिवसभर १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत आहेत. पॉईंट फेलिअरमुळे वसई आणि विरार दरम्यानच्या ट्रेन सेवा धीम्या मार्गावरून सुरू आहेत. त्यामुळे वसईवरून विरारला जाणाऱ्या सर्व लोकल विस्कळीत झाल्या आहेत. दुरूस्तीचे काम सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले.