मुंबईः मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहासमोर मंगळवारी बेस्टच्या विद्युत बसच्या अपघातात ७५ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. बेस्टच्या बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटरगाडीला धडक दिली. बस आणि मोटरगाडीमध्ये चिरडून एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मलबारहिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अपघातात नीता शहा (७५) या महिलेचा मृत्यू झाला. मॉर्निंग वॉकसाठी त्या जात होत्या. सह्याद्री अतिथीगृहासमोर बस मार्ग क्रमांक १०५ ही बस विजय वल्लभ चौकातून कमला नेहरू पार्ककडे सकाळी ९.१० वाजता जात होती. सह्याद्री अतिथीगृहासमोर बस येताच चालकाला अचानक आवाज ऐकू आला. तो ऐकून तो बसमधून बाहेर पडला आणि त्याने पाहिले की एका पादचारी महिला बसच्या डाव्या बाजूच्या मागील चाकाखाली आली होती. महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला उभी असलेल्या मोटरगाडीचेही नुकसान झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी मोबाईल व्हॅन आणली. त्यातून महिलेला ताबडतोब जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. जे. जे. रुग्णालयातील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर डॉ. स्नेहल जाधव यांनी त्या महिलेला दाखल करण्यापूर्वी मृत घोषित केले. त्यानुसार याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या अपघात प्रकरणी बेस्टचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत. मलबार हिल परिसरात झालेल्या अपघाताच्या ठिकाणी न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या मदतीने तपासणी करण्यात आली. मुंबई पोलिसांचे न्यायवैद्यक पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून काही नमुने गोळा केले. बेस्ट बस आणि स्कोडा या मोटरगाडीमध्ये चिरडून मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.