मुंबईः वसई जवळील नायगाव येथे ७५ वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. त्याप्रकरणी रिक्षा चालक व मोटरसायकस्वाराविरोधात बोरिवली येथील एमएचबी पोलीस ठाण्यात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनोळखी मोटरसायकलस्वाराने वृद्ध महिलेला दहिसर पुलावर धडक देऊन पळ काढला होता. तेथे तिला रुग्णालयात नेण्यासाठी रिक्षात बसवण्यात आले होते. रिक्षा चालकाने महिलेला रुग्णालयाऐवजी रस्त्याच्या कडेलाच सोडून पळ काढल्याचा आरोप आहे.

हेही वाचा >>> मुंबई: धावत्या लोकलमध्ये महिलेचे मंगळसूत्र चोरणाऱ्या दोघांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लक्ष्मी सयानी (७५) असे मृत महिलेचे नाव असून त्या बोरिवलीमधील शिंपोली परिसरात वास्तव्यास होत्या. त्यांचा नातू गणेश जांबुळे (२५) यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, लक्ष्मी या ३० मे रोजी घरातून बाहेर पडल्या. त्या परत आल्याच नाहीत. त्यांचा शोध घेतला असता त्या कोठेच सापडल्या नाहीत. अखेर त्या बेपत्ता असल्याबाबत बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. एका वयोवृद्ध महिलेला १ जून रोजी दहिसर पुलावर एका अज्ञात मोटरसायकस्वाराने धडक दिल्याचे कुटुंबियांना समजले. त्यानुसार त्यांनी परिसरातील विविध रुग्णालयात शोध घेतला असता त्यांना आजी सापडली नाही. अखेर नायगाव येथे एका वृद्ध महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती बोरिवली पोलिसांकडून कुटुंबियांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तपासणी केली असता त्या लक्ष्मी सयानी असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी तपासणीत दहिसर पुलावर त्यांना अज्ञात दुचाकीस्वाराने धडक देऊन तेथून पळ काढल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी रिक्षात बसवण्यात आले होते. रिक्षा चालकाने त्यांना रुग्णालयात नेण्याऐवजी नायगाव येथील कामण – भिवंडी येथील रस्त्यावर सोडले. अपघातामुळे जखमी झालेल्या लक्ष्मी यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी अनोळखी रिक्षा चालक व दुचाकीस्वाराविरोधात पोलिसांनी भादंवि कलम ३०४ (अ), २०१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दुचाकीस्वार आणि रिक्षा चालकाचा शोध सुरू आहे.