पश्चिम घाटामधून ८३४ खाद्यवनस्पतींची नोंद; मुंबईत २००हून अधिक खाद्यवनस्पती
मुंबई : पश्चिम घाटामध्ये बागडणाऱ्या रंगीबेरंगी फुलपाखरांच्या पालनपोषणासाठी आवश्यक असणाऱ्या खाद्यवनस्पतींच्या माहितीचे संकलन एका संयुक्त संशोधन पत्रिकेमध्ये करण्यात आले आहे. ‘जर्नल ऑफ थेट्रेंड टॅक्सा’मध्ये खाद्यवनस्पतींची ही यादी प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई आणि आसपासच्या परिक्षेत्रामधून २००हून अधिक खाद्यवनस्पतींची नोंद करण्यास संशोधकांना यश आले आहे.
भारतामध्ये फुलपाखरांच्या १८०० प्रजाती आढळत असून यामधील ४०० प्रजाती वन्याजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित आहेत. पश्चिम घाटामधून फुलपाखरांच्या ३३६ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. फुलपाखरांच्या वेगवेगळ्या प्रजातींचे पालनपोषण हे ठरावीक खाद्यवनस्पतींवरच होत असते. अळी अवस्थेपासून त्याचे फुलपाखरात रूपांतर झाल्यानंतरही फुलातील मध, झाडांचा डिंक, नासलेली फळे, मृत खेकडे, सस्तन प्राण्यांची विष्ठा यांवर त्यांचे पालनपोषण होत असते. उदाहरणार्थ नवाब आणि राजा या वर्गात मोडणारी फुलपाखरे खाद्यासाठी प्राण्यांची विष्ठा, झाडांचा डिंक यांवर अवलंबून असतात. तर स्मॉल सॅलमॉन अरब हे फुलपाखरू खारफुटीच्या जंगलातील मेस्वाक या आपल्या खाद्यवनस्पतीवर अवलंबून असते. सदाहरित जंगलात मलबार पिकॉक, क्रूझर, तमिल योमेन, मलबार बॅण्डेड स्व्ॉलोटेल, मलबार ट्री निम्क सारखी मोठी फुलपाखरे आढळतात. तसेच बोर-बाभळीसारख्या खाद्य वनस्पतींजवळ टारुकस आणि बाबूल ब्ल्यू प्रजातीमधील फुलपाखरे दिसून येतात.
मात्र वाढत्या शहरीकरणामुळे फुलपाखरांच्या अधिवासासाठी आवश्यक असणाऱ्या खाद्यवनस्पती मुंबईतून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गेल्या काही दशकांपासून मुंबईतून फुलपाखरांच्या काही प्रजाती नामशेष झाल्या आहेत. डॉ. कृष्णमेघ कुंटे, नितीन अचारी, परेश चुरी, व्ही. बालकृष्णन, कालेश सदाशिव या अभ्यासकांनी महाराष्ट्र- गोवा- केरळ- कर्नाटक- तमिळनाडू राज्यांमधून ३२० फुलपाखरांच्या प्रजाती प्रकाशाझोतात आणल्या आहेत. तर ‘जर्नल ऑफ थेट्रेंड टॅक्सा’ या संशोधन पत्रिकेत प्रकाशित झालेल्या शोधनिबंधामध्ये संशोधकांनी पश्चिम घाटांमधून ८३४ खाद्यवनस्पतींची नोंद केली आहे. या सर्व वनस्पती ८८ प्रकारच्या वर्गात मोडत असून अजूनही १६ फुलपाखरांच्या खाद्य वनस्पतींची नोंद होणे बाकी आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुगांरेश्वर अभयारण्य, येऊर, कांदळवनाचे जंगल, आरे कॉलनी, महाराष्ट्र निसर्ग उद्यान, ओवळेकर वाडी फुलपाखरू उद्यान, हँगिग गार्डन यांसारख्या हरित क्षेत्रांमधून २०० हून अधिक खाद्यवनस्पतींची नोंद झाल्याची माहिती फुलपाखरू अभ्यासक परेश चुरी यांनी दिली. मात्र सातत्याने होत असलेल्या शहरीकरणामुळे आणि हरित पट्टय़ांची कत्तल वाढल्याने काही खाद्यवनस्पती नष्ट होत आहेत. त्यामुळे त्यावर पालनपोषण करणाऱ्या फुलपाखराच्या प्रजातींना धोका निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
बनावट फोटो तयार करत तरुणीला लग्नासाठी धमकी
मुंबई: एकतर्फी प्रेमातून तरुणीचे बनावट फोटो तयार करत तिला लग्नासाठी धमकवणाऱ्या आरोपीला सोमवारी घाटकोपर पोलिसांनी अटक केली. दीपक पुजारी (वय २३) असे या आरोपीचे नाव असून तो रत्नागिरीतील राजापूर येथील राहणारा आहे.घाटकोपर परिसरात राहणारी पिडीत तरुणी काही महिन्यांपूर्वी एका नातेवाईकाच्या लग्नासाठी राजापूर येथे गेली होती. याच वेळी आरोपीने या तरुणीला पाहून तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरला. तरुणीचे नाव आणि दूरध्वनी क्रमांक शोधून काढल्यानंतर आरोपीने या तरुणीची छायाचित्रे तिच्या फेसबुक खात्यावरून काढून घेतली. त्यानंतर तरुणीच्या छायाचित्रांसोबत आपले छायाचित्र जोडून, दोघांनी लग्न केल्याचे बनावट छायाचित्र तयार केले. ते छायाचित्र प्रसारमाध्यमांवर पसरविले. त्यानंतर आरोपीने या तरुणीला फोन करुन लग्नासाठी तगादा लावला. तिच्या कुटुंबियांना बदनामी करण्याची अनेकदा धमकीही दिली. याबाबत तरुणीने घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.