मुंबई : शहरातील विविध सरकारी रुग्णालयांच्या शवगृहांमध्ये सध्या सुमारे ९१ बेवारस मृतदेह पडून आहेत. ते मृतदेह प्रामुख्याने अपघातग्रस्त व्यक्ती, भिकारी आणि वृद्ध नागरिकांचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यापैकी काही मृतदेह सहा महिन्यांहून अधिक काळापासून तेथे आहेत. त्यामुळे यासंदर्भात त्वरित कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेहावर अत्यसंस्कार करण्याच्या सूचना संबंधित तपासी अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
बेवारस मृतदेहांवर अत्यसंस्कार अथवा ते वैद्यकीय शिक्षणासाठी दान करण्याची प्रक्रिया करण्यात येते. मुंबई पोलिसांच्या शल्यचिकित्सक विभागाच्या अखत्यारित सर जे.जे. शवविच्छेदन केंद्र, राजावाडी शवविच्छेदन केंद्र, कूपर शवविच्छेदन केंद्र व सिद्धार्थ शवविच्छेदन केंद्रात बेवारस मृतदेह आणले जातात. शवविच्छेदन व न्यायवैधक चाचण्यांसाठी आवश्यक नमुने घेतल्यानंतर मृतदेह तेथील शवागृहात ठेवले जातात. मुंबईत पोलीस शल्यचिकित्सा विभागाच्या अखत्यारितील शवागृहात एकूण २३० मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. तेथे सध्या ९१ बेवारस मृतदेह आहेत. नियमानुसार सात दिवसांत बेवारस मृतदेहांवर अत्यसंस्कार करणे अनिवार्य असते. पण ९१ पैकी काही मृतदेह २०२४ मधील आहेत. एक मृतदेह तर २०२२ पासून शवागृहातच असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
कार्यप्रणालीनुसार मृत व्यक्तीचे छायाचित्र सर्व पोलीस ठाण्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये प्रसारित केले जातात. काही वेळा वृत्तपत्रांमध्येही ते प्रसिद्ध करण्यात येतात. तसेच बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासण्यात येतात. मात्र, ओळख पटत नसेल तर संबंधित मृतदेह शवविच्छेदन केंद्रातच पडून राहतात. ओळख पटवण्यासाठी पोलीस मृतदेहावरील गोंदण, जन्मखूण किंवा कपड्यांवरील विशेष चिन्हे, धार्मिक चिन्हे, पती अथवा पत्नीचे गोंदवलेले नावे आदींच्या नोंदी केल्या जातात. तसेच त्यांचा डीएनएही घेतला जातो. त्याचे नमुने ठेवण्यात येतात.
मुंबई परिसरात सरासरी १२० मृतदेह बेवारस सापडतात. मुंबईत ६० व पालघर परिसरात सरासरी २० मृतदेह दर महिन्याला बेवारस राहतात. मात्र सध्या सुमारे ९१ मृतदेह शवागृहात पडून आहेत. राज्यात वैद्यकीय शिक्षणासाठी १० विद्यार्थ्यांमागे एक मृतदेहाची आवश्यता आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयांना दान करणे आवश्यक असल्याचे एका डॉक्टरने सांगितले. मुंबईतील पोलिसांच्या शल्यचिकित्सक विभागाच्या अखत्यारितील गोरेगाव येथील शवागृह वगळता अन्य ठिकाणी शीत खोल्या आहेत.
गोरेगावमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी विशिष्ठ शीतगृह आहे. त्यात १८ मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. जे. जे. रुग्णालयात सर्वाधिक म्हणजे ४० मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. नियमानुसार सात दिवसांत बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. पण ते सर्वस्वी तपास अधिकाऱ्यांवर अवलंबून असते. एखादा अधिकारी मृतांचे नातेवाईक सापडतील, याबाबत आशादायी असतो. परिणामी, अनेक प्रकरणांमध्ये एक ते दोन महिन्यांचाही कालवधी वाढवतो. पण एक मृतदेह २३ मे २०२२ पासून शवागृहात पडून आहे. जुहू पोलीस ठाण्याकडून २०२२ मध्ये आलेला संबंधित मृतदेह अद्याप तसाच आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे शल्यचिकित्सक विभागाने नुकतीच अशा मृतदेहांची सूची जारी केली असून संबंधित तपासी अधिकाऱ्यांना तात्काळ मृतदेहाबाबत पुढील प्रक्रिया करण्याचे सूचना करण्यात आल्या आहे. वारंवार सूचना करूनही मृतदेह तसेच पडून राहिल्यामुळे बेवारस मृतदेहांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वातानुकूलीत संयंत्राचे तापमान नियंत्रीत न राहता मृतदेह खराब होण्याची शक्यता असते, असे अधिकाऱ्याने सांगितले.