मुंबई : फेसबुकवर एका अनोळखी तरुणीची मैत्रिची विनंती स्वीकारणे चांदिवलीतील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. प्रिया कुमारी नामक तरूणीने आपल्या सौंदर्याची भुरळ घालून सदर व्यक्तीबरोबर मैत्री केली. नंतर शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास भाग पाडून तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक केली. विशेष म्हणजे अवघ्या १९ दिवसांत या तरुणीने त्याची फसवणूक केली.
फिर्यादी ४४ वर्षांचे असून चांदिवली येथे राहतात. त्यांना १४ मे रोजी फेसबुकवर प्रिया कुमारी नावाच्या एका तरुणीची मैत्रिची विनंती आली होती. ती फॅशन डिझायनर असून दिल्लीच्या गुडगाव येथे राहणारी असल्याचे तिच्या फेसबुकवरील माहितीत नमुद केले होते. फेसबुक प्रोफाईवर तिचे सुंदर छायाचित्र होते. त्याची भुरळ फिर्यादींना पडली आणि त्यांनी मैत्रिची विनंती स्वीकारली. यानंतर प्रिया कुमारी मेेसेंजरमध्ये आली आणि तिने संभाषण सुरू केले. दुसऱ्याच दिवशी तिने आपला व्हॉट्स ॲप असलेला मोबाइल क्रमांक त्यांना दिला. यानंतर फिर्यादी तिच्याशी व्हॉट्स ॲपवर बोलू लागले. औपचारिक बोलणे झाल्यानंतर प्रियाकुमारीने त्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीच्या दोन टिप्स दिल्या. फिर्यादींनी त्याची पडताळणी केली असता त्या खऱ्या निघाल्या आणि त्यांचा विश्वास बसला. मात्र ते अलगद तिच्या जाळ्यात अडकले.
अशी केली फसवणूक
प्रिया कुमारीने फिर्यादींना एका संकेतस्थाची लिंक देऊन तेथे नोंदणी करण्यास सागितले. तेथे त्यांना रितिका शर्मा नावाच्या तरुणीने संपर्क साधला आणि टेलिग्रामची लिंक दिली. गुंतवणूक केल्यास कशा प्रकारे फायदा होईल हेही तिने सांगितले. त्यानुसार टेलिग्रामवर त्यांनी ॲप डाऊनलोड केले आणि ३९ लाख ५७ हजार रुपयांचे शेअर्स आणि आयपीओ विकत घेतले. त्या ॲपवर फिर्यादींना ९० लाख रुपयांचा नफा झाल्याचे दाखविण्यात आला. त्यांनी ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. पंरतु आता ही रक्कम काढली तर मोठा कर द्यावा लागेल असे सांगून त्यांना थाबवण्यात आले. नंतर रितिका शर्मा आणि प्रिया कुमारी यांचे फोन बंद झाले. अधिक चौकशी केली असता ते संकेतस्थळ, ॲप बनावट असल्याचे निष्पन्न झाले. १४ मे ते ४ जून या अवध्या १९ दिवसांच्या कालावधीत फेसबुकवरी अनोळखी तरूणीने त्यांना तब्बल ४० लाख रुपयांचा गंडा घातला होता. यानंतर फिर्यादींनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ (ड), भारतीय न्याय संहितेच्या ३१८ (४), ३१९ (२), ३३६ (२), ३३६ (३), ३३८, ३४० (२), ६१ (२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फेसबुकवरील अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा
फेसबुकवर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करताना सावध रहावे, असे आवाहन पोलिसांनी केेले आहे. सुंदर छायाचित्र असलेल्या मुलींच्या नावाने मैत्रिची विनंती पाठवली जाते. त्यांनतर फेसबुक खाते हॅक करून त्याचा गैरवापर केला जातो. अनेकदा अश्लील कृत्यात अडकवले जाते, तसेच आर्थिक फसवणूक केली जाते. त्यामुळे आपले फेसबुक प्रोपाईल लॉक ठेवावे, तसेच खात्री पटल्याशिवाय अनोळखी व्यक्तींच्या रिक्वेस्ट स्वीकारू नये, असे पोलिसांनी सांगितले.