मुंबई : विकासकाकडून १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाप्रकरणी छोटा राजन टोळीतील दोनजण मरिना फर्नांडिस आणि क्लेरेन्स जोसेफ रेमेडिओस यांना मुंबईतील सत्र न्यायालयाने नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केला.

याप्रकरणी गुन्हे शाखेने पाच आरोपींना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत मरिना आणि क्लेरेन्स या दोघांची नावे पुढे आली होती. त्या पार्श्वभूमीवर दोघांनी वकील अथर्व भिंगारदेव आणि यश एम. नाईक यांच्यामार्फत सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. पवार यांच्यासमोर मरिना आणि क्लेरेन्स यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालायने दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वांद्रेस्थित एका ५८ वर्षांच्या महिलेने तिची १३०० चौरस मीटरची मालमत्ता तक्रारदार विकासकाला विकली होती. याबाबतच्या व्यवहाराची माहिती मिळताच अन्य आरोपी रेमी फर्नांडिस आणि वकील प्रदीप यादव यांनी विकासकाला फोन केला आणि विक्रेतीने गणेश राम सरोदी यांच्याशी या जागेबाबत आधीच व्यवहार केला असल्याचे सांगितले. तसेच, त्या आधारे विकासकाकडे दहा कोटी रुपयांच्या खंडणी मागणी केली. यात मरिना आणि क्लॅरेन्स यांनीही महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा गुन्हे शाखेने केला होता. तथापि, विकासक आणि अन्य आरोपींमध्ये फोनवरून झालेले संभाषण हे मरिना आणि क्लॅरेन्स यांचा गुन्ह्यातील सहभाग दर्शवण्यासाठी पुरेसे नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले व दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.