मुंबई : दोन वर्षांनंतर पूर्णपणे निर्बंधमुक्त वातावरणात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचा उत्साह यंदा विक्रमी दणदणाटात परावर्तीत झाला. मुंबईत १२०.२ ,तर पुण्यात १०५ डेसिबलपर्यंत आवाजाची नोंद झाली. ठाण्यातही आवाजाची पातळी ओलांडली गेली. मुंबईत ठिकठिकाणांहून निघालेल्या विसर्जन मिरवणुकांची शनिवारी २१ तासानंतर सांगता झाली. तर पुण्याची मिरवणूक तब्बल २९ तास चालली. ढोल-ताशा, नाशिकबाजा, बेन्जोच्या तालावर थिरकत भक्तांनी गणरायाचा निरोप घेतला.

मुंबईत अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनादरम्यान सर्वाधिक १२०.२ डेसिबल इतकी आवाजाची पातळी नोंदविण्यात आली. शुक्रवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान ऑपेरा हाऊस येथे ही नोंद झाली आहे. २०१९ मध्ये विसर्जन सोहळय़ात सर्वाधिक १२१.३ डेसिबल इतकी आवजाची पातळी होती. २०२० मध्ये करोनाकाळ असल्याने आवाज कमी होता. यावेळी १००.७ डेसिबल इतकी आवाजाची पातळी नोंदविण्यात आली होती. २०२१ मध्ये ही पातळी आणखी कमी झाली. यावर्षी सर्वात कमी ९३.१ डेसिबल इतकी आवाजाची पातळी होती.  विसर्जन सोहळय़ात विविध वाद्यांमुळे आवाजाची पातळी वाढली. शुक्रवारी सकाळपासून मध्यरात्री उशिरापर्यंत आवाजाचा दणाणा होता. मुंबईतील बहुतांश ठिकाणी १०० डेसिबलच्या वर आवाज नोंदवला गेला आहे. ऑपेरा हाऊस पाठोपाठ सांताक्रूझ येथील शास्त्रीनगरमध्ये ११८ डेसिबल इतकी नोंद करण्यात आली. वरळी, पेडर रोड येथे १०५ डेसिबल, माटुंगा येथे १०३ डेसिबल, वरळी नाका येथे १०२ डेसिबल, जुहू तारा येथे १०१ डेसिबल आणि शिवाजी पार्क येथे ९९ डेसिबल इतकी आवाजाची पातळी नोंदवली गेली. गिरगाव चौपाटीवर सर्वात कमी ९३ डेसिबल इतकी आवाजाची पातळी नोंदविण्यात आली, अशी माहिती आवाज फाऊंडेशनच्या सुमेरा अब्दुलाली यांनी दिली.

सांस्कृतिक नगरीत..

पुण्यात यंदा मिरवणुकीत सरासरी १०५ डेसिबल ध्वनिपातळीची नोंद झाली. त्यातही शनिवारी सकाळी ८ वाजल्यानंतर खंडुजीबाबा चौकातील ध्वनिपातळी १२७.५ डेसिबल, म्हणजे अतिधोकादायक पातळीवर गेल्याचे दिसून आले. या पूर्वी सर्वाधिक ध्वनिपातळी १०९ डेसिबल २०१३ मध्ये नोंदवली गेली होती. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ही ध्वनीपातळी नोंदवली.

पुण्यात २९ तास आवाजाचे..

मंडई येथे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता मिरवणुकीला आरंभ झाला. त्यानंतर सलग २९ तासांनंतर मिरवणुकीची सांगता झाली. दोन वर्षांच्या खंडानंतर विसर्जन मिरवणूक होत असल्याने लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता आदी विसर्जन मार्गावर अलोट गर्दी लोटली होती. त्यातच कार्यकर्त्यांचा उत्साह, एकूण मिरवणुकीची संथ असलेली गती, ढोलपथकांचे चौकांमध्ये बराच वेळ वादन अशा कारणांनी मिरवणूक लांबली. भवानी पेठेतील कासेवाडी येथील महाराष्ट्र तरुण मंडळ हे मिरवणुकीतील शेवटचे मंडळ ठरले. या मंडळाने शनिवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ‘श्रीं’चे विसर्जन केले.

मिरवणुकीत उच्चक्षमतेच्या ध्वनिवर्धकांचा वापर करणाऱ्या गणेश मंडळांची नोंद करण्यात आली असून, संबंधित मंडळांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले.

१०५ डेसिबल आवाज २४ तास किंवा त्याहून अधिक काळ ऐरणे, हे कानांच्या आरोग्यासाठी धोक्याचे आहे. आवाजाच्या आघातांमुळे कान दुखणे, तात्पुरता किंवा अधिक काळ बहिरेपणा येणे, कानात शिट्टी वाजल्यासारखा अस्वस्थ करणारा आवाज येत राहणे अशी लक्षणे दिसतात. शिवाय, एकाग्रता नाहीशी होणे, चिडचिड होणे, उलटी उलटी होणे हे सगळे कानावर झालेल्या आघाताचे परिणाम आहेत.

– डॉ. राजीव यंदे, ज्येष्ठ कान-नाक-घसा तज्ज्ञ

कुठे, काय घडले?

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये अहमदनगरमध्ये हाणामारी.

– जळगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत अज्ञातांची महापौरांच्या बंगल्यावर दगडफेक.

– पुणे शहरातील मुंढवा येथे दोन गटात हाणामारी, पुण्यातील शिक्रापूर येथे फटाके फोडण्यावरून वाद.

– चंद्रपुरात गणेश मंडळाचे स्वयंसेवक आणि पोलिसांमध्ये वादावादी. 

घडले काय?

मुंबईत गणेशोत्सवात ध्वनिक्षेपकांचा वापर आणि विसर्जन मिरवणुकांमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याचे ‘आवाज फाउंडेशन’च्या अहवालातून स्पष्ट झाले. या अहवालानुसार काही ठिकाणी पाच दिवसांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ११२ ते ११५ डेसिबल आवाजाच्या पातळीची नोंद झाली होती. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनादरम्यान मात्र ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ झाली.

तज्ज्ञांच्या मते..

विशिष्ट वयानंतर अशा दणदणाटामुळे कायमस्वरूपी बहिरेपणाही येऊ शकतो. रक्तदाब वाढून शरीरावर त्याचे गंभीर परिणामही संभवतात. त्यामुळे कानासह संपूर्ण आरोग्यासाठीच १०५ ते १२० डेसिबल आवाज अत्यंत धोकादायक आहे, असे ज्येष्ठ कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ. राजीव यंदे यांनी सांगितले.

राज्यात विसर्जनावेळी १४ बुडाले 

मुंबई, ठाणे : राज्यात काही ठिकाणी गणेशमूर्तीच्या  विसर्जनाला दुर्घटनांचे गालबोट लागले. विसर्जनाच्यावेळी वेगवेगळय़ा घटनांमध्ये २० जणांचा मृत्यू झाला. यांपैकी १४ जणांचा बुडून मृत्यू झाला. मुंबईत कांदिवलीत विसर्जन मिरवणुकीत नृत्य करताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, तर ठाण्यात पावसामुळे गणेश मंडळावर झाड कोसळून ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले.

विसर्जनाच्या वेळी वध्र्यात चार जण; यवतमाळ, अहमदनगर आणि जळगावमध्ये प्रत्येकी दोन जण; पुणे, धुळे, सातारा, सोलापूर येथे प्रत्येकी एकाचा बुडून मृत्यू झाला. तर, नागपूरमध्ये गणेश विसर्जनाच्यावेळी झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. ठाणे कोलबाड येथील गणेशोत्वाच्या मंडपात शुक्रवारी रात्री आरती सुरू असताना एक झाड कोसळले. या दुर्घटनेत राजश्री वालावलकर (५५) यांचा मृत्यू झाला आहे. प्रतीक वालावलकर (३०), सुहासिनी कोलुंगडे (५६),कीविन्सी परेरा ( ४०), आणि दत्ता जावळे (५०) हे चौघे जखमी झाले आहेत. तर दोन दुचाकींचे आणि गणपती मंडपाचे नुकसान झाले आहे.

पनवेल येथे मिरवणुकीदरम्यान विजेचा धक्का लागून नऊ महिन्यांच्या मुलासह ११ जण जखमी झाले. शुक्रवारी सायंकाळी विद्युत जनरेटरची तार तुटल्याने ही घटना घडली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मिरवणुकीत सहभागी असलेल्या ११ जणांना विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने ते जखमी झाले.