मुंबईः सायबर फसवणूक करणाऱ्यांना बँक खाती पुरवणाऱ्या २४ वर्षीय तरूणाला सायबर पोलिसांनी अटक केली. आरोपीने कर्नाटकमधील मुख्य आरोपीला सायबर फसवणूकीसाठी १९ बँक खाती पुरवल्याचा आरोप आहे. त्यात सायबर फसवणूकीतील कोट्यावधी रुपये जमा झाल्याचा संशय आहे. तपासणीत संबंधीत बँक खाती, भाजी विक्रेते, शेतीमाल व्यावायिक अशा व्यक्तींच्या नावावर आहेत. तक्रारदार महिला (६७ वर्ष) या गिरगाव येथील रहिवासी आहेत.
शेअर ट्रेडिंगमध्ये चांगला नफा मिळवून देण्याचे आमीष दाखवून या महिलेची ६७ लाख १५ हजार १७४ रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली होती. याबाबत अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार १६ जानेवारीला तक्रारदार महिलेला श्रुती बाहेती या महिलेचा दूरध्वनी आला होता. तिने शेअर ट्रेडिंगमध्ये चांगला परतावा देण्याच्या नावाखाली महिलेला लिंक पाठवली होती. त्यानंतर गुंतवणुकीच्या नावाखाली महिलेला विविध बँक खात्यात ६७ लाख १५ हजार १७४ रुपये जमा करण्यास भाग पाडण्यात आले. या महिलेलाही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले होते. तेथे शेअर मार्केट गुंतणूकीबाबत मार्गदर्शन केले जात असल्याचा बनाव रचण्यात आला होता. महिलेने याप्रकरणी तक्रार केल्यानंतर सायबर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपासाला सुरूवात केली.
त्यावेळी तपासात महिलेने जमा केलेल्या विविध बँक खात्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी तक्रारदार महिलेने एका बँक खात्यात १६ लाख रुपये जमा केले होते. ते बँक खाते कल्याणी एंटरप्राइजेस या हेमंत माळी यांच्या नावावर असलेल्या खासगी बँकेचे खाते होते. संंबंधीत खातेदार हा शेती व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत असून त्याच्या नावावरचे खाते हे आरोपी मोहित आकाश भोजराज (२४) हा वापरत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी दहिसर पश्चिम येथील भीमनगर परिसरातील रहिवासी होता.
अखेर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्यावेळी आरोपीने सायबर फसवणूक करणाऱ्यांसाठी १९ बँक खाती उघडल्याचे निष्पन्न झाले. या संपूर्ण प्रकरणामागे कर्नाटकातील मँगलोर येथील एक सराईत आरोपी असून त्याला आरोपीने १९ बँक खाती पुरवली होती. भाजी विक्री, शेती विषयक व्यवसाय असे व्यवसाय करणाऱ्यांच्या व्यक्तींना हेरून आरोपी बँक खाते उघडण्यास सांगायचा. त्यानंतर त्या व्यक्तीला व्यवसायासाठी बँक खाते आवश्यक असल्याचे सांगून ते बँक खाते सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपींना द्यायचा. संबंधीत बँक खात्यांमध्ये मोठ्याप्रमाणात रक्कम जमा झाली असून ती तक्रारदार व्यक्तींची असल्याचा पोलिसांना संशय आहे.