मुंबई : हार्बर मार्गावरील रे रोड येथील ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाच्या जागी नव्या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून हा उड्डाणपूल प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. या उड्डाणपुलामुळे प्रवाशांंच्या वेळेसह इंधनाचीही बचत होणार आहे. तसेच, उड्डाणपुलावरील सहा मार्गिकांमुळे वाहतूक कोंडीतूनही मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, येत्या वर्षात संपूर्ण राज्यभरात एकूण २५ रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन महारेलने (महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) केले आहे.

रे रोड येथे १९१० मध्ये बांधण्यात आलेला ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाल्यामुळे २०२२ मध्ये त्याचे पाडकाम करण्यात आले. त्याच्या जागी नवा प्रशस्त केबल आधारित पूल बांधण्याचा निर्णय महारेलने घेतला होता. महारेलने फेब्रुवारी २०२२ पासून रे रोड सागरी सेतूप्रमाणे केबल स्टेड पुलाचे बांधकाम हाती घेतले. या पुलाच्या उभारणीसाठी हार्बर मार्गावर वेळोवेळी मेगाब्लॉक घेऊन पुलाच्या तुळया उभारण्याचे काम करण्यात आले. सुमारे २६६ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. नुकताच हा उड्डाणपूल प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला असून त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

रे रोड उड्डाणपुलामुळे भायखळा व माझगाव या भाग जोडले गेले असून त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही अशी कमी होण्याची शक्यता आहे. महारेलने प्रथमच रे रोड हा केबल आधारित पुल बांधला आहे. पुलाच्या उभारणीसाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने महारेलला अर्थसहाय्य केले आहे. महारेल, मध्य रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका यांच्यातील समन्वयाने विक्रमी वेळेत पुलाची उभारणी करण्यात आली आहे. तसेच, येत्या वर्षभरात राज्यातील विविध ठिकाणी आणखी २५ रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन महारेलने केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, महारेलने टिटवाळा येथेही रेल्वे उड्डाणपुलाची उभारणी केली आहे. या पुलाच्या उभारणीसाठी एमएमआरडीएने महारेलला आर्थिक सहाय्य केले आहे. सुमारे ८२० मीटर लांबीच्या या उड्डाणपुलावर चार मार्गिका असणार आहेत. पुलाच्या मजबुतीकरणासाठी आरसीसी डेकही बांधण्यात आले असून दोन्ही बाजूला सेवा रस्त्यांचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.