मुंबईः वहिनीला भूत मारून टाकेल, अशी भीती दाखवून एका मांत्रिक महिलेने लाखो रुपये रुपयांचे दागिने व रोख रकमेचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी महिला मेहजबीन रईस खान ऊर्फ हजरत मरियम हिच्याविरोधात खंडणी, फसवणूकीसह महाराष्ट्र जादुटोणा प्रतिबंधक कायद्यातील कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेने अशा प्रकारे आणखी काही व्यक्तींची फसवणूक केल्याचा संशय असून त्याबाबत पार्क साईट पोलीस अधिक तपास करीत आहेत.
विक्रोळी (प.) परिसरात वास्तव्यास असलेल्या ४८ वर्षीय तक्रारदार मुलुंडमधील एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. त्याच्या शेजारीच भाऊ व वहिनी राहतात. त्यांच्या वहिनीला मानसिक आजार असून गेल्या १० वर्षांपासून त्यांच्यावर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण त्यांच्या मानसिक स्थितीत सुधार होत नव्हती. त्यामुळे तक्रारदाराच्या भावाने वहिनीला घाटकोपर येथील मेहजबीन ऊर्फ हजरत मरियम हिच्याकडे नेले. त्यांच्या पत्नीला पाहून तिला भूतबाधा झाली असून ती भूतबाधा घालविण्यासाठी काही खर्च करावा लागेल असे तिने सांगितले. त्यामुळे त्याच्यासह त्याच्या वडिलांनी तिला काही सोन्यासह बकर्याचा बळी देण्यासाठी पाच हजार रुपये दिले होते. त्यानंतर तिने तिच्या हातावर एक धागा बांधला. मात्र त्यातूनही त्यांना काहीच फरक पडला नव्हता.
अखेर तक्रारदारांची वहिनी राहत असलेल्या सोसायटीमधील आत्महत्या केलेल्या तरूणाचे भूत त्यांच्या मागे आहे. त्याच्या आई कर्ज फेडावे लागेल, अन्यथा भूत महिलेला मारून टाकेल, अशी भीती आरोपी महिलेने घातली. तसेच घरातील सोने आणायला सांगितले. अशा प्रकारे आरोपी महिलेने भीती दाखवून तक्रारदारांचा भाऊ व पुतणीकडून १५ हजार रोख व तीन लाखांचे दागिने घेतले. हा प्रकार १ सप्टेंबर २०२४ पासून सुरू आहे. पण त्यानंतरही महिलेला बरे वाटत नसल्यामुळे अखेर मांत्रिक महिलेने त्यांची फसवणूक केल्याचे लक्षात आले.त्यानुसार याप्रकरणी पार्क साईट पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.
पोलिसांनी तक्रारीची पडताळणी करून मांत्रिक महिलेविरोधात खंडणी, फसवणूक व जादुटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मेहजबीन हिला अटक करण्यात आली. आरोपी महिलेने अशा प्रकारे आणखी व्यक्तींची फसवणूक केल्याचा संशय असून त्याबाबत पार्क साईट पोलीस अधिक तपास करीत आहेत.