मुंबई : ग्रामीण भागात आर्थिक हालाकी व आजारांचे प्रमाण इतके मोठे आहे की एकटी शासकीय आरोग्य सेवा लोकांना पुरेशी पडू शकत नाही. अनेकदा रुग्ण आरोग्य व्यवस्थेपर्यंत वेळेत पोहोचत नाही. अनेकदा त्याला आजाराची जाणीवही होते ती खूप उशीरा. या सर्वांचा विचार करून एक तरुण डॉक्टर एक घेय्य मनाशी बाळगून मराठवाड्यातील वैजापूर तातुक्यात गावोगावी जाऊन ‘आरोग्याची वारी’ करत आहे. वैजापूर तालुक्यातील २६५ गावांमध्ये जाऊन ‘आरोग्य वारी’करण्याचा या डॉक्टरचा संकल्प असून आतापर्यंत ९४ गावांमध्ये ‘आरोग्य वारी’ पार पडली आहे. जवळपास 23 हजार लोकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली असून शेकडो गरजू रुग्णांवर दाखल करून उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

गेली काही वर्ष अडिचशे खाटांचे अत्याधुनिक धर्मादाय रूग्णालय व त्याच जोडीला वैद्यकीय शिक्षण देणा-या शैक्षणिक संस्था उभ्या करून वैजापूरचे शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक चित्र बदलण्याचा ‘ध्यास’ घेऊन डॉ अमोल अन्नदाते काम करत आहेत. ग्रामीण भागातील वैद्यकीय गरज लक्षात घेऊन गेली दीड वर्ष त्यांनी गरजू व गोरगरीब रूग्णांच्या दाराशी जाऊन आरोग्यसेवा देण्याचा संकल्प सोडला. यातून जन्माला आली एक अभिनव संकल्पना ‘आरोग्य वारी’. डॉ. अमोल अन्नदाते हे मुंबईतील सेठ जीएस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पीटल इथून एमबीबीएस व एमडी केले. त्यानंतर वाडिया येथून एनआयसीयू व पीआयसीयू फेलोशीप असे उच्चशिक्षण पूर्ण करून माता मृत्यू व बालमृत्यूचा दर जास्त असलेल्या त्यांच्या मराठवाड्यातील वैजापूर या दुष्काळग्रस्त तालुक्यात परतले ते ग्रामीण भागात रुग्णसेवा करण्याचे व्रत घेऊन. या आरोग्य वारीमध्ये व्यसनमुक्तीचे महत्वही ते समजूवन सांगतात.

वैजापूर हा छत्रपती संभाजीनंगर जिल्ह्यामधील सर्वात कमी अवर्षण असलेला दुष्काळग्रस्त तालुका. त्यामुळे बहुतांश रूग्ण हे आर्थिक दुर्बल घटकातून येतात. यापैकी अनेकांना उपचारांसाठी हॉस्पीटलमध्ये येणेही परवत नाही. म्हणून आपणच ‘आरोग्य वारी’च्या माध्यमातून वैजापूर तालुक्यातील प्रत्येक घरापर्यंत जायचे, गावात जाऊन त्यांच्या आरोग्यविषयक, सामाजिक समस्या जाणून घ्यायच्या आणि सोडवायच्या हा मूलभूत हेतू ठेवून ग्रामीण भागामध्ये मान्यता असलेल्या वारकरी संप्रदायाची जोड दिली तर त्यात लोकसहभाग वाढून आरोग्य सेवेबद्दल एक वेगळा विश्वास निर्माण होईल, ही मानसिकता डॉ. अमोल अन्नदाते यांनी ओळखली आणि वारी व आरोग्य सेवा यांचा सुयोग्य मिलाफ घडवून आणला.‘आरोग्य वारी’च्या माध्यमातून थेट तळागाळातील समस्यांचा अभ्यास केला जातोय. या उपक्रमांतर्गत मोफत आरोग्य शिबिरे, संवाद सत्रे आणि गावपातळीवरील लोकसहभागामुळे गरजूंना प्रत्यक्ष वैद्यकीय मदत पोहोचवण्यास मदत होत आहे. आरोग्य, शिक्षण, जल व्यवस्थापन, शेतकरी कल्याण व महिला सक्षमीकरण या क्षेत्रांत प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवून ग्रामीण जीवनमान उंचावण्याचे कार्य यानिमित्ताने होत आहे.

‘आरोग्य वारी’च्या तीन दिवस आधी प्रत्येक गावात पाच ते सात स्वयंसेवकांची टीम जाऊन जनजागृती करते. डॉ. अमोल अन्नदाते स्वत: फोन करून त्या गावातील सर्व प्रमुख व्यक्तींना आरोग्य दिंडी आणि आरोग्य शिबिरात सहभागी होण्यासाठी निमंत्रण देतात. गावाची लोकसंख्या कितीही कमी असली तरी एका दिवशी एकाच गावात ‘आरोग्य वारी’ आयोजित केली जाते. यादरम्यान टीमच्या माध्यमातून गावातील आरोग्य आणि सामाजिक समस्यांचादेखील आढावा घेतला जातो. ‘आरोग्य वारी’च्या दिवशी डॉ. अमोल अन्नदाते यांच्यासोबत आठ-दहा डॉक्टर, नर्सिंग व पॅरामेडिकल स्टाफ, फिझिओथेरपिस्ट अशी मोठी टीम सकाळी साडेसात वाजताच गावात दाखल होते. सकाळी आठ वाजता गावातील सर्व लोकांना एकत्र भजनी मंडळाच्या साथीने टाळ-मृदंगाच्या तालावर अभंग म्हणत गावातीतून आरोग्य दिंडी काढली जाते. आरोग्य वारीची टोपी घालून प्रत्येकाचे दिंडीमध्ये स्वागत केले जाते. गावातून जसजशी आरोग्य दिंडी पुढे जाते तसं डॉ. अमोल अन्नदाते गावातील प्रत्येक घराच्या पायरीवर जाऊन आरोग्याचा संदेश देतात व दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतात. प्रत्येक गावामध्ये जवळपास शंभर ते दिडशे लोक आरोग्य दिंडीत उत्साहाने सहभागी झालेले पाहायला मिळतात. दिंडी गावातून फिरून आल्यावर डॉ. अमोल अन्नदाते एक ग्रामसभा घेतात. गावक-यांशी संवाद साधून गावातील लोकांचे आरोग्य, सामाजिक विषय, शिक्षण, पाणी, पायाभूत सुविधांबाबत माहिती घेऊन जनजागृती केली जाते. लोकांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाते.

आरोग्य दिंडींची सांगता झाल्यानंतर आरोग्य शिबिर सुरू होते. यामध्ये गावक-यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषध वाटप केले जाते. सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंत डॉ. अमोल अन्नदाते त्या गावातच थांबतात. गावातील प्रत्येक रूग्णाच्या आरोग्याची तपासणी ते स्वत: करतात व त्याशिवाय ते गावातून बाहेर पडत नाहीत. यामध्ये तिथे आलेल्या बाह्य रूग्णांना मोफत औषध वाटपच नव्हे तर ज्या रूग्णांना पुढील उपचाराची आवश्यकता असते त्यांना वैजापूर येथील धर्मदाय रूग्णालयात बोलवले जाते. तिथे त्यांच्यावर मोफत उपचार केले जातात. वयोवृद्ध मंडळी आणि ज्यांच्या घरात कुणी नातेवाईक नाहीत त्यांच्यासाठी गाव ते हॉस्पीटलदरम्यान प्रवासाची मोफत सोयदेखील केली जाते.

महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यचा निधी, सिद्धीविनायक ट्रस्ट अशा विविध योजना ट्रस्टच्या माध्यमातून मदत उभी केली जाते, तसेच ‘आरोग्य वारी’तून आलेल्या रूग्णांना मदत करण्यासाठी डॉ. अमोल अन्नदाते यांनी ध्यास ट्रस्टची स्थापना केली आहे. ध्यास ट्रस्टला अनेक दात्यांचा हातभार लागला असून त्या माध्यामातूनही रूग्णांसाठी आर्थिक तरतूद करण्यात येते. डॉ. अमोल अन्नदाते यांची ‘आरोग्य वारी’शी असलेली बांधिलकी आणि आरोग्य सेवेचा ‘ध्यास’ पाहून सर्वसामान्य लोकामधूनही अर्थसहाय्य उभे राहू लागले आहेत. सामान्य माणसांनी कमीत कमी शंभर रूपये मासिक रक्कम आरोग्य सेवेसाठी मदत म्हणून दिल्यास त्यातून आरोग्य सेवेसाठी एक साखळी उभी राहिल, असे डॉ. अमोल अन्नदाते यांना वाटते. या आवाहनाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून समाजातील गोरगरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या रूग्णांना मोठी मदत उभी राहत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६ डिसेंबर २०२३ रोजी सुरू झालेल्या ‘आरोग्य वारी’ उपक्रमाअंतर्गत आजवर वैजापूर तालुक्यातील ९४ गावांमध्ये ‘आरोग्य वारी’ यशस्वीपरणे पार पडली आहे. आतापर्यंत झालेल्या वाऱ्यामध्ये एकूण तेवीस हजांराहून जास्त रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली आहे, आतापर्यंत एकूण ३०१ रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, २८० रूग्णांना रूग्णालयात दाखल करून घेण्यात आलंय. १५० हून अधिक ॲन्जिओप्लास्टी आणि ६८ लहान मुलांच्या शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत. मुंबई व पुण्यातील मोठ्या शासकीय रूग्णालयात ज्यांना उपचारांची आवश्यकता आहे, त्यांना तिथे उपचार घेण्यासाठी मदत केली जाते. लवकरच शंभरावी ‘आरोग्य वारी’ पार पडणार आहे. यानिमित्ताने शंभराव्या वारीला महाआरोग्य वारीचे स्वरूप देऊन त्यादिवशी विठ्ठल नामगजराचा व एका दिवसात सर्वाधिक मोफत रूग्णतपासणीचा विक्रम करण्याचा डॉ. अमोल अन्नदाते यांचा मानस असून त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. गेली तीन वर्षे डॉ. अमोल अन्नादाते यांनी वैजापूर तालुक्यातील ७५० आशासेविका व अंगणवाडी सेविका यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करून त्यांच्या रूग्णालयात या ७५० जणींना मोफत आरोग्य सेवा देऊ केली आहे. तळागाळात काम करणा-या या आशासेविका व अंगणवाडी सेविकाचे आरोग्य वारीमध्ये मोठे सहकार्य लाभत आहे.