Aaditya Thackeray on drone near matoshree : शिवसेना पक्षप्रमुख यांच्या निवासस्थान ‘मातोश्री’च्या बाहेर ड्रोन आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. या ड्रोनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेना (ठाकरे) गटाकडून वेगवेगळे आरोप केले जात आहे. मातोश्रीवर ड्रोन नेमका कोणत्या हेतूसाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यादरम्यान शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान शिवसेनेच्या नेत्यांकडून वेगवेगळे आरोपे केले जात असताना एमएमआरडीएकडून हा ड्रोन मुंबई पोलिसांच्या परवानगीने सर्वेक्षण करण्यासाठी उडवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आल आहे. असे असले तरी आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर यासंबंधीत एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ते म्हणाले, “आज सकाळी आमच्या निवासस्थानात डोकावून पाहताना एक ड्रोन पकडला गेला आणि जेव्हा माध्यमांना याबद्दल माहिती मिळाली, तेव्हा एमएमआरडीए (@MMRDAOfficial) म्हणते आहे की मुंबई पोलिसांच्या परवानगीने बिकेसीसाठी सर्वेक्षण केले जात होते.

ठीक आहे.

कोणत्या सर्वेक्षणात तुम्हाला घरांमध्ये डोकावून पाहण्याची आणि पकडले जाताच तात्काळ उडून जाण्याची परवानगी मिळते?

रहिवाशांना माहिती का दिली गेली नाही?

एमएमआरडीए संपूर्ण बीकेसीसाठी फक्त आमच्याच घराचे पाळत ठेवत आहे का?

एमएमआरडीएने त्याऐवजी जमिनीवर उतरले पाहिजे आणि एमटीएचएल (अटल सेतू) सारख्या त्याच्या बोगस कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, जे की त्यांच्या भ्रष्टाचाराचे एक उदाहरण आहे.

तसेच, जर पोलिसांनी परवानगी दिली होती, तर रहिवाशांना माहिती का देण्यात आली नाही?”

कोणते षडयंत्र लपलेले आहे का?

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी देखील या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट विविध शंका उपस्थित केल्या आहेत. परब पोस्टमध्ये म्हणाले, “शिवसेना पक्षप्रमुख यांच्या निवासस्थान ‘मातोश्री’च्या बाहेर एक ड्रोन घिरट्या घालताना दिसला – पण प्रश्न असा आहे की हा ड्रोन नेमका कोणाचा आणि कोणत्या हेतूसाठी होता? या ड्रोनद्वारे चित्रीकरण का करण्यात आले? यामागे कोणतेही अतिरेकी पार्श्वभूमी कारण तर नाही ना? मातोश्रीसारख्या Z+ सुरक्षा असलेल्या संवेदनशील क्षेत्रात न कळवता ड्रोनद्वारे शूटिंग करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमागे कोणते षडयंत्र लपलेले आहे का, याचा शोध घेणे आवश्यक आहे.”

“सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. प्रशासनाने सखोल चौकशी करून या ड्रोनमागील उद्देश, जबाबदार व्यक्ती आणि त्यामागील पार्श्वभूमी स्पष्ट करावी जेणेकरून शिवसैनिक आणि नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर होईल,” असेही परब म्हणाले आहेत.