मुंबई : हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथेचा संगम असणारा ‘सितारे जमीन पर’ हा हिंदी चित्रपट यूट्यूब किंवा ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होण्याची चर्चा आहे. मात्र या सगळ्या अफवा असून हा चित्रपट फक्त चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार असल्याचे प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांनी स्पष्ट केले आहे. तसेच भारतातील लोकसंख्येच्या अनुषंगाने चित्रपटगृहांची संख्या वाढणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

आर.एस. प्रसन्ना दिग्दर्शित व आमिर खान प्रोडक्शन्स निर्मित ‘सितारे जमीन पर’ हा हिंदी चित्रपट २० जूनपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. आमिर खान प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटात आरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशिष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर हे १० उदयोन्मुख तारे झळकत आहेत. तर प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे गीते अमिताभ भट्टाचार्य, संगीत शंकर-एहसान-लॉय आणि पटकथा दिव्य निधी शर्मा यांची आहे.

‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट यूट्यूब व ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होण्याची चर्चा ऐकली, मात्र हा चित्रपट फक्त चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार आहे. आजवर माझे विविध चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन पाहिले आणि त्यामुळेच मी आज यशस्वी स्थानी आहे. यूट्यूब व ओटीटी माध्यमावर चित्रपट प्रदर्शित न करून एक मोठी चूक करतो आहे, असे वाटू शकते. पण मी चित्रपट या कलेवर खूप विश्वास ठेवतो आणि प्रामाणिकपणे काम करतो. त्यामुळे सध्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटगृहातच प्रदर्शित करण्याचा विचार आहे’, असे आमिर खान यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतातील काही जिल्ह्यांमध्ये एकपडदा चित्रपटगृहही नाहीत : आमिर खान

सध्या चित्रपटगृहातील व्यवसायाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही आहे. पण माझा प्रेक्षकांवर विश्वास आहे, चित्रपटगृहात कलाकृती प्रदर्शित करून या व्यवसायाला नवसंजीवनी द्यायची आहे. सध्या अनेक निर्माते जोपर्यंत चित्रपट ओटीटी माध्यमासाठी विकला जात नाही, तोपर्यंत चित्रपटगृहात कलाकृती प्रदर्शित करीत नाही. मात्र मला सर्वप्रथम चित्रपट हा चित्रपटगृहातच प्रदर्शित करायचा आहे. तसेच सध्या भारतातील काही जिल्ह्यांमध्ये एकपडदा चित्रपटगृहही नाहीत, त्यामुळे लोकसंख्येच्या अनुषंगाने भारतातील चित्रपटगृहांची संख्या वाढली पाहिजे, असे आमिर खान म्हणाले.