मुंबई : ‘आरे वाचवा’ आंदोलनाने केलेल्या आवाहनाला नागपूरसह आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, बिहार, केरळ आणि तेलंगणा अशा राज्यातील पर्यावरणप्रेमींनी रविवारी प्रतिसाद देऊन आरे वाचविण्यासाठी आंदोलन केले. आरेतील पिकनिक पॉईंटसह गोरेगाव रेल्वे स्थानकातही आंदोलन करण्यात आले.

आरेत कामावरील बंदी उठवून राज्य सरकारने आरेत कारशेड तयार करण्याच्यादृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. त्यामुळे आता आरे वाचवा आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी आरे वाचविण्यासाठी रविवारी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला देशभरातील पर्यावरणप्रेमींनी प्रतिसाद देऊन आरे वाचवाचा नारा दिला. जवळपास ११ राज्यात आरेसाठी आंदोलन करण्यात आले. एकीकडे देशभरात पर्यावरणप्रेमींना आरे वाचविण्यासाठी पुढे येण्याची साद घातली असताना मुंबईतील आंदोलन आणखी व्यापक करण्यात आले आहे.

हेही वाचा : पवई तलावात आढळल्या १८ मगरी; मुंबई महापालिकेकडून करण्यात आली गणना

राज्य सरकारपर्यंत आपला आवाज आणखी तीव्रतेने पोहचविण्यासाठी आरे वाचवा आंदोलकांनी आता मुंबईभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आतापर्यंत केवळ आरेतील पिकनिक पॉईंट येथेच आंदोलन, केले जात होते. मात्र रविवारी गोरेगाव रेल्वे स्थानक, लोकलमध्ये आंदोलन करण्यात आल्याची माहिती आरे संवर्धन गटाकडून देण्यात आली. त्याचवेळी आता केवळ रविवारीच नव्हे तर इतर दिवशीही सरकारविरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यानुसार लवकरच घाटकोपरमध्ये मोठे आंदोलन होणार असून मुंबईतील विविध ठिकाणी आंदोलन, निदर्शन करण्यासाठीचे नियोजन सुरू आहे.

लोकलमध्येही आरे वाचवा आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी आरे पिकनिक पॉईंट येथे सकाळी ११ ते दुपारी १२ अशी एक तासाची परवानगी पोलिसांकडून आरे वाचवा आंदोलकांना देण्यात आली होती. त्यामुळे १२ नंतर पोलिसांनी आंदोलकांना पिकनिक पॉईंट येथून हुसकावून लावले. यानंतर काही आंदोलकांनी गोरेगाव स्थानकावर धाव घेत लोकलमध्ये जनजागृतीपर गाणी गात आरे वाचविण्यासाठी मुंबईकरांना साद घातली.