मुंबई : प्रेमाच्या प्रवासातील द्वेष, गमावलेला विश्वास, राग आणि दुरावा या सगळ्याचा नेमका अर्थ व संबंध मांडणाऱ्या ‘आरपार’ या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर प्रमुख भूमिकेतील ललित प्रभाकर व ऋता दुर्गुळे यांच्या अभिनयाने प्रेक्षकांनी मने जिंकली असून नवोदित अभिनेत्री जान्हवी सावंतचीही भूमिका लक्षवेधी ठरली आहे. जान्हवी सावंत हिने ‘आरपार’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असून तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.
प्रेमाची अनोखी परिभाषा ‘आरपार’ या मराठी चित्रपटातून पाहायला मिळत आहे. महाविद्यालयीन जीवनात झालेली मैत्री ते कालांतराने नात्यात आल्यानंतरचा दुरावा आणि त्यानंतर नेमके काय घडत जाते ? याची गोष्ट चित्रपटात रंगवण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौरव पत्की याने केले असून ललित प्रभाकर, ऋता दुर्गुळे, माधव अभ्यंकर, स्नेहलता वसईकर, सुहिता थत्ते, जान्हवी सावंत आदी कलाकारांच्या लक्षवेधी भूमिका चित्रपटात आहेत.
एकूणच ‘आरपार’ चित्रपटाचे कथानक आणि ललित – ऋतासह इतरही कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. दरम्यान, ‘आरपार’ चित्रपटात झळकलेल्या जान्हवी सावंतसारख्या नवोदित चेहऱ्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. ही नवी अभिनेत्री नमकी कोण ?, असा प्रश्नही साऱ्यांना पडला. जान्हवी सावंत हिने ललितच्या होणाऱ्या पत्नीची सहजतेने साकारलेली भूमिका अनेकांना भावली. ललित – ऋतासह जान्हवी सावंतच्या भूमिकेचीही चर्चा होत आहे.
‘मला ‘आरपार’ चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे. हा माझा पहिलाच चित्रपट आहे आणि पहिल्यांदाच अभिनय करताना खूप चांगल्या सहकलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळाली, हे माझे भाग्यच म्हणायला हवे. ‘आरपार’ चित्रपटाने मला खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टीतील मार्ग मोकळे करून दिले आहेत. आता आणखी बऱ्याच चित्रपटांसाठी काम करण्यासाठी मी उत्सूक आहे’, असे जान्हवी सावंत हिने सांगितले.