मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तत्कालीन प्रमुख आरती सिंह यांची पोलीस सह आयुक्त (गुप्तवार्ता) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी संघटनाच्या हालचाली आणि ‘स्लीपर सेल्स’वर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुंबईसाठी सहाव्या सह पोलीस आयुक्त पदाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबतचे आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले. पूर्वी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे प्रमुखपद अतिरिक्त पोलीस आयुक्तपदाच्या अधिकाऱ्याकडे होते. ते पद आता उन्नत करून सह पोलीस आयुक्त दर्जाचे करण्यात आले आहे. तसेच व्हीआयपी सुरक्षा व संरक्षणाची जबाबदारीही याच अधिकाऱ्याकडे असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बदलापूर येथे दोन शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. आरती सिंह त्या एसआयटीच्या प्रमुख होत्या. एसआयटीने याप्रकरणाचा तपास करून आरोपी अक्षय शिंदेविरोधात कल्याण येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. आरती सिंह यांना आता मुंबईत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सह पोलीस आयुक्त (गुप्तवार्ता) या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्या पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होत्या. त्या आता मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या प्रमुख असतील.
सह पोलीस आयुक्त अधिकारी हा महानिरीक्षक (आयजी) दर्जाचा असतो. पूर्वी मुंबई पोलिसांची विशेष शाखा सह पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था यांच्या अंतर्गत होती. या अधिकाऱ्याअंतर्गत मुंबईतील सर्व पोलीस ठाणी आहेत. या नवीन पदामुळे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांच्या जबाबदारीत घट झाली आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. मुंबई पोलिसांची सर्व गुप्तचर यंत्रणा याच विभागाअंतर्गत चालते. सध्या विशेष शाखेचा अतिरिक्त आयुक्त कायदा व सुव्यवस्था विभागाच्या सह पोलीस आयुक्तांना अहवाल देतो. मात्र, हे पद उन्नत झाल्यानंतर नवीन सह पोलीस आयुक्त गुप्तचर विभागाचे सर्व अहवाल थेट मुंबई पोलीस आयुक्तांना सुपूर्त करतील. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला चालना मिळाली. त्यानंतर शुक्रवारी याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.

अलीकडील एका बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना पाकिस्तानकडून वापरल्या जाऊ शकणाऱ्या स्लीपर सेल्सवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे गुप्तचर यंत्रणेला आवश्यक तेवढे महत्त्व देणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी मुंबई पोलिसांची पाच सह आयुक्त पदे होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष पोलीस आयुक्त पद

मुंबई पोलीस दलातील विशेष पोलीस आयुक्त पद अवनत करून त्याचे सहपोलीस आयुक्त (गुप्तवार्ता) पद तयार करण्यात आले आहे. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती हे पूर्वी मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्त पदावर कार्यरत होते. भारती मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर विशेष पोलीस आयुक्तपद रिक्त होते. राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी विशेष पोलीस आयुक्त पदाची निर्मिती केली होती. हे पद अपर पोलीस महासंचालक दर्जाचे होते. सरकारने हे पद अवनत करून महानिरीक्षक दर्जाचे केले आहे. त्याचे नवीन नाव पोलीस सह आयुक्त (गुप्तवार्ता) असे करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासकीय निकड म्हणून निर्माण करण्यात आलेले विशेष पोलीस आयुक्त पद दोन वर्षांतच सरकारने अवनत केले आहे. यापूर्वी मुंबई पोलीस आयुक्त पद महासंचालक दर्जाचे होते. भारती यांची नियुक्ती करताना हे पद पुन्हा अपर महासंचालक दर्जाचे करण्यात आले होते.