मुंबई : दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा पुनर्विकासाच्या निविदेत अखेर एएटीके कन्स्ट्रक्शन्स या कंपनीने बाजी मारली आहे. त्यामुळे आता कामाठीपुरा पुनर्विकास एएटीके कन्स्ट्रक्शन्सकडूनच मार्गी लावला जाणार आहे. एएटीके कन्स्ट्रक्शनला पुनर्विकासाचे कंत्राट देण्यासंबंधीचा प्रस्ताव म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून नुकताच राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर कामाठीपुरा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल.

अंदाजे ३४ एकर जागेवरील कामाठीपुरा परिसरातील ७०० हून अधिक इमारतींची दुरावस्था झाली असून ६ हजारांहून अधिक रहिवासी जीर्ण इमारतींमध्ये राहत आहेत. या इमारती दुरुस्तीच्या पलिकडे गेल्या आहेत. त्यामुळे येथील इमारतींचा पुनर्विकास करणे आवश्यक झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कामाठीपुराच्या पुनर्विकासाची जबाबदारी म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाकडे दिली. त्यानुसार मंडळाने आराखडा तयार करत प्रकल्पास राज्य सरकारची मान्यता घेत अखेर काही महिन्यांपूर्वी कन्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेंट एजन्सी (सी अँड डी) प्रारुपानुसार अर्थात खासगी विकासकाची नियुक्ती करत पुनर्विकास मार्गी लावण्याकरिता निविदा मागविल्या होत्या. या निविदेस काही कारणाने अनेकदा मुदतवाढ देण्यात आल्याने पुनर्विकास लांबणीवर पडला होता. पण शेवटी निविदेस दोन कंपन्यांनी प्रतिसाद दिला. मेसर्स जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड आणि एएटीके कन्स्ट्रक्शन्स या कंपन्यांनी निविदा दाखल केल्या होत्या. या निविदांची छाननी करत दुरुस्ती मंडळाने काही दिवसांपूर्वी आर्थिक निविदा खुल्या केल्या आहेत. त्यानुसार यात एएटीके कन्स्ट्रक्शन्सने बाजी मारली आहे.

एएटीके कन्स्ट्रक्शन्सची निविदा अंतिम करण्यासंबंधीचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. आता राज्य सरकारच्या मान्यतेची प्रतीक्षा असल्याची माहिती दुरुस्ती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. निविदेस मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करत कामाठीपुराच्या पुनर्विकासाला सुरुवात केली जाणार आहे.

कामाठीपुरा येथील ८००१ निवासी आणि ८०० जमीन मालकांचे पुनर्विकासाअंतर्गत पुनर्वसन केले जाणार आहे. पात्र निवासी रहिवाशांना ५०० चौ. फुटाची घरे दिली जाणार असून पात्र अनिवासी रहिवाशांना २२५ चौ. फुटाचे गाळे दिले जाणार आहेत. पुनर्वसित इमारती ५७ मजली तर विक्रीसाठीच्या इमारती ७८ मजली असणार आहेत. या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत जमीन मालकांना कामाठीपुऱ्यात ५० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंड मालकास ५०० चौरस फुटाचे एक घर देण्यात येणार आहे. तर ५१ ते १०० चौ. मीटरचा भूखंड असलेल्या जमीन मालकास ५०० चौ. फुटाची दोन घरे आणि १०१ ते १५० चौ. मीटर जागेच्या मालकास ५०० चौरस फुटाच्या तीन सदनिका देण्यात येणार आहेत. १५१ ते २०० चौ. मीटर भूंखड असलेल्या जमीन मालकास चार घरे देण्यात येणार आहे. २०० चौरस मीटरहून अधिक क्षेत्रफळाच्या भूखंड मालकास प्रत्येक ५० चौरस मीटर भूखंडासाठी ५०० चौरस फुटाचे एक अतिरिक्त घर देण्यात येणार आहे.