मुंबई : काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर सखूबाई कोण? या गोष्टीची सर्वत्र चर्चा रंगली होती. ही चर्चा अखेर संपुष्टात आली असून ‘आतली बातमी फुटली’ आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आहे. नुकतेच तिचे आणि प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव यांचे ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटातील सखूबाई हे पहिले धमाकेदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या धमाकेदार गाण्याला एग्नेल रोमन यांनी संगीत दिले आहे. तर चैतन्य कुलकर्णी यांनी लिहिलेले हे गाणे सोनाली सोनावणे हिने गायले आहे.

आयुष्याच्या प्रवासात एकमेकांवरील विश्वास महत्त्वपूर्ण ठरत असतो आणि पती – पत्नीचे नाते प्रेम व विश्वासावर टिकून असते. परंतु काही कारणास्तव याच नात्यात कटुता येऊन जोडीदाराच्या खुनाची सुपारी देण्याची वेळ आलेल्या एका नवऱ्याची आणि सुपारी घेणाऱ्या व्यक्तीची उडणारी त्रेधातिरपीट दाखविणारा ‘आतली बातमी फुटली’ हा मराठी चित्रपट १९ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार हे ‘आतली बातमी फुटली’ हा नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत.

ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, अभिनेता सिद्धार्थ जाधव असे नामवंत चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या तिघांसोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर आदी कलाकारांची जमून आलेली भट्टी आणि खिळवून ठेवणारी कथा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. या चित्रपटाची निर्मिती विशाल पी. गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सहनिर्माता अम्मन अडवाणी, तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.

प्रत्येकाला ठेका धरायला लावणाऱ्या सखूबाई या गाण्यात गौतमी पाटील आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी चांगलीच धमाल आणली आहे. ‘हे गाणे करताना आम्हाला खूप मजा आली. प्रेक्षकांनाही हे गाणे ठेका धरायला लावेल’ , असा विश्वास दोघांनी व्यक्त केला. दरम्यान, या गाण्यापलीकडे ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटात अभिनेते मोहन आगाशे यांनी संवादातून आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी आपल्या देहबोलीतून रंगत वाढवली आहे. केवळ शक्यतांचा अंदाज बांधून खुनाच्या सुपारीभोवती फिरणाऱ्या चित्रपटाच्या कथानकाच्या माध्यमातून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा गमतीशीर खेळ पाहायला मिळणार आहे.