मुंबई: एखाद्या बातमीमागे असलेल्या गोष्टीचा शोध लावण्यासाठी बातमीच्या मुळाशी जावे लागते. अनेकदा विविध अडथळ्यांचा सामना करून बातम्या मिळवाव्या लागतात. याप्रमाणे ‘आतली बातमी फुटली’ या मराठी चित्रपटात नेमके कोणत्या बातमीचे रहस्य उलगडणार? हे पाहणे औत्सूक्याचे ठरणार आहे. या चित्रपटाचा रंजक टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून ६ जून रोजी चित्रपट प्रदर्शित होत आहे.

टिझरमधून रहस्य, धमाल आणि चित्रविचित्र घटनांची मजेशीर झलक पाहायला मिळाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.वैविध्यपूर्ण आशयघन चित्रपटांच्या निर्मितीसाठी मराठी चित्रपटसृष्टी ओळखली जाते. त्यामुळे वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार ‘आतली बातमी फुटली’ हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहेत. एका खूनाच्या सुपारीच्या रहस्यभेदाभोवती या चित्रपटाची कथा फिरते. ही रंजक कथा दाखवताना उडणारा गोंधळ आणि अनपेक्षित घटनांची धमाल ‘आतली बातमी फुटली’ या मराठी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव एकत्र आले आहेत. या तिघांसोबत अभिनेते विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर आदी कलाकारांची जमून आलेली भट्टी आणि खिळवून ठेवणारी कथा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.

विनोदीशैलीतील गुन्हेगारीपट असणारा हा चित्रपट धक्कादायक वळण घेत प्रत्येकाला ‘आश्चर्यचकित’ करेल, असा विश्वास दिग्दर्शक विशाल पी. गांधी यांनी व्यक्त केला.‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाची निर्मिती विशाल पी. गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सह निर्माता अम्मन अडवाणी, तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ आणि संकलन रवी चौहान यांचे आहे. संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कथा जैनेश इजरदार आणि पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवाद लेखन जीवक मुनतोडे, व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहे. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी आणि नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज यांनी सांभाळली आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. कास्टिंग दिग्दर्शन जोकीम थोरास यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत. फिल्मास्त्र स्टुडिओजने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे.