मुंबई : संत तुकाराम महाराजांच्या अभंगांची गाथा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम – कथा संत तुकारामांच्या गाथेची…’ या चित्रपटाच्या माध्यमातून ७ नोव्हेंबर २०२५ पासून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी मुंबईत संपन्न झाला. याप्रसंगी आपल्या संस्कृतीला आणि महाराष्ट्राच्या भूमीला अपेक्षित असलेली चित्रनिर्मिती दिग्पाल लांजेकर करीत आहेत. याची प्रचिती ‘शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतून येते, असे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आवर्जून नमूद केले.

‘अभंग तुकाराम – कथा संत तुकारामांच्या गाथेची…’ या चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याला लेखक, दिग्दर्शक, कलाकार, गायक व तंत्रज्ञांनी हजेरी लावली होती. याप्रसंगी पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात विविध अभंग व गीतांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच नृत्य व नाट्याचा आविष्कारही उपस्थितांनी अनुभवला. याप्रसंगी संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज प्रशांत महाराज मोरे आणि त्यांचे चिरंजीव स्वप्नील मोरे उपस्थित होते. ‘अभंग तुकाराम – कथा संत तुकारामांच्या गाथेची…’ चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची भूमिका साकारणार असून त्यांच्या पत्नीच्या आवलीच्या भूमिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे दिसणार आहे.

‘अभंग तुकाराम – कथा संत तुकारामांच्या गाथेची’ या चित्रपटाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन आणि या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळो. तसेच या भक्तीपरंपरेत लिन होण्याची आत्मिक शक्ती नागरिकांमध्ये जागरूक होवो. जेव्हा इच्छाशक्ती व आत्मिक शक्ती एकत्र होते, त्यावेळेला ब्रह्मानंदाचे टाळ वाजतात’, असेही मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले.

महाराष्ट्र शासनाकडून संत ज्ञानेश्वर महाराजांवर चित्रपट – ॲड. आशिष शेलार यांची घोषणा

महाराष्ट्र शासन संत ज्ञानेश्वर महाराजांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष (७५०) साजरे करीत आहे आणि यावर्षीच ‘अभंग तुकाराम – कथा संत तुकारामांच्या गाथेची’ हा चित्रपट प्रदर्शित होणे, हा उत्तम योग आहे. शासन निर्णयानुसार सांस्कृतिक कार्य विभागाकडून ज्या चित्रपटांची निर्मिती होते आणि सहकार्य केले जाते, त्या चित्रपटांसाठी दहा कोटी रुपयांपर्यंतचा खर्च केला जातो. विषय नियमावलीनुसार कोणता चित्रपट करायचा हे ठरविले जाते. या अनुषंगाने यावर्षी महाराष्ट्र शासन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहे, अशी घोषणा ॲड. आशिष शेलार यांनी केली.