मुंबई : भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यावर हा अपघात घडला. लालू कांबळे (५९) असे या अपघातात मरण पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. खड्ड्यांमुळे ते सावकाश दुचाकी चालवत होते. मात्र मागून येणाऱ्या डंपरने त्यांना धडक दिली.

अंधेरीच्या महाकाली लेणी परिसरात लालू कांबळे (५९) रहात होते. शनिवारी दुपारी ते आपल्या दुचाकीवरून लॅपटॉप दुरूस्त करण्यासाठी जात होते. जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यावरून विक्रोळीच्या दिशेने जात असताना दुपारी सव्वा दोनच्या सुमारास त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. खड्ड्यांमुळे ते गाडी हळू चालवत होते.

मात्र मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर चालकाने कांबळे यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात कांबळे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पळून जाणारा डंपर चालक साजिद शेख (२५) याला गस्तीवरील पोलिसांनी अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याच्याविरोधात पवई पोलीस ठाण्यात निष्काळजी, बेदरकारपणे वाहन चालवणे तसेच निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकऱणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.