मुंबई : देशातील पहिले कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञान समूह विकास (क्लस्टर) केंद्र राज्यात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचे धोरण महिनाभरात जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक विकास महामंडळातीलप्रदूषित पाण्यावर नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रक्रिया करणारे प्रकल्प डोंबिवली, तळोजा आणि तारापूर येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी दिली.लंडन दौऱ्यावरून परतल्यानंतर सामंत यांनी सांगितले की, दौऱ्यात राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी विविध कंपन्या आणि शिष्टमंडळांसमवेत १३ बैठका झाल्या.
त्यात येणाऱ्या काळात राज्यात मोठी गुंतवणूक आणण्याबाबत चर्चा झाली असून काही नवीन प्रकल्प उभारण्याबाबत कंपन्यांनी स्वारस्य दाखविल्याचे सामंत यांनी सांगितले. कोकणचे सुपुत्र अजित जावकर ऑक्सफर्ड विद्यापीठातील कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानचे संचालक असून त्यांचा कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानातील अनुभव दांडगा आहे. त्यांनी देशातील पहिले कृत्रिमप्रज्ञा तंत्रज्ञान समूह विकास केंद्र पुणे, नाशिक अथवा छत्रपती संभाजी नगरात उभारण्यास स्वारस्य दाखविले आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.