मुंबई: चाकूचा धाक दाखवून तिघांनी एका रिक्षा चालकाचा मोबाइल आणि काही रोख रक्कम लुटल्याची घटना दहा दिवसांपूर्वी चेंबूर परिसरात घडली होती. याबाबत टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून याप्रकरणी एका आरोपीला नवी मुंबई परिसरातून अटक केली असून पोलीस त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.
चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनी परिसरात वास्तव्याला असलेले श्रीकृष्ण साव (२८) रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. ते ४ सप्टेंबर रोजी रात्री चेंबूरच्या लोखंडे मार्ग परिसरात प्रवाशांना सोडून घरी जात होते. याचवेळी त्यांच्या रिक्षात तीन अनोळखी इसम बसले. हे तिघे साव यांना एका निर्जनस्थळी घेऊन गेले आणि त्यांचा मोबाइल आणि रोख रक्कम असा एकूण साडेपाच हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला. रिक्षा चालकाने तात्काळ टिळक नगर पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान सदर आरोपी गोवंडी परिसरात वास्तव्याला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तिघांपैकी एक आरोपी सिद्धार्थ अवचर (२२) नवी मुंबईतील नेरुळ परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.