मुंबई- इंदोर-दौंड एक्स्प्रेस मधून ४० लाखांच्या दागिन्याची बॅग चोरणाऱ्या आरोपीला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासात अटक केली आहे. महेश घाग उर्फ विक्की हा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून निवृत्त पोलिसाचा मुलगा आहे. विशेष म्हणजे १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटला होता.
तक्रारदार महिला या ७२ वर्षीय असून आपल्या पतीसह इंदोर येथून लोणावळा येथे होणाऱ्या धार्मिक भागवत कथा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाल्या होत्या. गाडीत रात्री जेवण झाल्यानंतर दोघे जण झोपले. या महिलेच्या बॅंगेत सोन्याचे विविध दागिने आणि ५० हजार रोख असा सुमारे ४० लाखांचा ऐवज होता. त्यामुळे त्यांती ती बॅग आपल्या उशाखाली सांभाळून ठेवली होती. सकाळी साडेसातच्या सुमारास लोणावळा स्थानक आल्यावर या महिलेला जाग आली. मात्र तिची बॅग गायब झाल्याचे आढळले. याप्रकरणी रेल्वेच्या हेल्पलाईनवर तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडेकर, पोलीस निरीक्षक रोहीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार केले होेते. पोलिसांनी ठिकठिकाणचे सीसीटीव्ही तपासण्यास सुरवात केली. हा आरोपी हा कल्याण स्थानकातून बाहेर जाताना दिसला. कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. हा आरोपी महेश घाग उर्फ विक्की असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला. तो चिपळूण येथे गेल्याची माहिती पुढील तपासात मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने चिपळूण येथे जाऊन त्याला अटक केली. गुन्हा घडल्याच्या १२ तासात आरोपीला अटक करण्यात पोलिसांच्या पथकाला यश आले. त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी निवृत्त पोलिसाचा मुलगा
याबाबत माहिती देताना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी सांगितले की आरोपी महेश घाग उर्फ विक्की हा सराईत गुन्हेगार आहे. नुकताच तो जामिनावरून सुटून आला होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपी हा एका निवृत्त पोलिसाचा मुलगा आहे. मौल्यवान वस्तू असलेली बॅग महिला आपल्या जवळ सांभाळून ठेवतात. त्यामुळे ट्रेनमधील चोर महिला प्रवासी झोपेत असल्याचा फायदा घेत त्या अलगद काढून घेतात. त्यामुळे प्रवासात शक्यतो मौल्यवान वस्तू, दागिने बाळगू नयेत, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.
या पथकाने केली कारवाई
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडेकर, पोलीस निरीक्षक रोहीत सावंत, कल्याण कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर सावंत, संदीप गायकवाड, राम जाधव, स्मिता वसावे, लक्ष्मण वळकुंडे, प्रमोद दिघे, रवींद्र ठाकूर, हितेश नाईक, अक्षय चव्हाण, रुपेश निकम, सुनिल मागाडे, तसेच कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद देशमुख, मंगेश खाडे, देवीदास अरण्ये आदींच्या पथकाने ही कारवाई केली.