लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : गोरेगाव येथे दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तीन सराईत आरोपींना अटक करण्यात दिंडोशी पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले. आरोपींकडून दरोड्यात वापरण्यात येणारी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याविरोधात यापूर्वी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी परिसरातील मोठे दुकान लुटण्याच्या प्रयत्नात होते.

मोहम्मद अली रफिक अन्सारी, सलमान मोहम्मद रफिक अन्सारी आणि नफीस मोहम्मद चौधरी ऊर्फ चपटा अशी या तिघांची नावे असून ते तिघेही गोरेगावच्या जी. वॉर्ड, बीएमसी कॉलनीतील रहिवासी आहेत. गोरेगामधील साईबाबा कॉम्प्लेक्स येथील ओम सत्यम सुपर मार्केट नावाचे एक दुकान आहे. या दुकानात रात्रीच्या वेळेस दरोड्याच्या उद्देशाने काहीजण येणार असल्याची माहिती दिडोंशी पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तिथे आधीपासून साध्या वेशात पाळत ठेवली होती. रात्री उशिरा तिथे सहा जण आले, त्यांची हालचाल संशयास्पद वाटताच पोलिसांनी सहापैकी तिघांना शिताफीने ताब्यात घेतले होते.

आणखी वाचा-घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; अनोळखींच्या खात्यातून लाखोंचे व्यवहार, आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीचं कनेक्शन काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन लोखंडी कटावणी, दोन सुरे, तलवार, मिरचीची पूड आदी मुद्देमाल सापडला. चौकशीत ते तिघेही तेथे दरोड्याच्या उद्देशाने आल्याचे उघडकीस आले. दिंडोशी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार हेमंत रोडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात दरोड्याच्या तयारीत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. मोहम्मद अलीविरुद्ध सात, सलमान मोहम्मदविरुद्ध आठ, तर नफीसविरुद्ध तीन गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या कारवाईदरम्यान त्यांचे तीन सहकारी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. चौकशीत त्यांची माहिती मिळाली असून याप्रकरणी पोलीस संशयीत आरोपींचा शोध घेत आहेत.