मुंबई: एका रिक्षाचालकावर अज्ञात व्यक्तीने ॲसिड हल्ला केल्याची घटना वांद्रे येथे घडली आहे. रविवारी रात्री रस्त्याने जात असताना अज्ञात व्यक्तीने मागून येऊन हा हल्ला केला. त्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वांद्रे पोलीस फरार हल्लेखोराचा शोध घेत आहेत.
फिर्यादी आतिक खान (४०) हा वांद्रे शास्त्री नगर येथे पत्नी हिना खान (३६) भाऊ नस्तईन खान आणि मुलांसह राहतो. रविवारी रात्री तो औषध आणण्यासाठी निघाला होता. मात्र घराजवळील औषधांचे दुकान बंद असल्याने तो हिल रोडवरील शिफा या औषध विक्री दुकानात जात होता. त्याच्याबरोबर भाऊ नस्तईन खान होता. मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास कुरेशी नगर येथील बाब मशिदीसमोरून जात असताना अचानक एका अज्ञात व्यक्तीने मागून येऊन आतिकवर ॲसिडने हल्ला केला. ज्वलनशील द्रवपदार्थ पाठीवर पडल्याने त्याला जळजळू लागले. त्याने लगेच आपला शर्ट काढला. त्याच्या कानाजवळ आणि डोळ्याजवळ ॲसिड उडाल्याने जळजळ होऊ लागली. ही बाब समजताच आतिकची पत्नी हिना खान हिने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. हल्लेखोर तो पर्यंत फरार झाला होता.
थोडक्यात डोळा वाचला
पोलिसांच्या मदतीने आतिकला वांद्रे पश्चिमेच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. कुठल्या प्रकारचे ॲसिड होते ते प्रयोगशाळेतील तपासणीनंतर स्पष्ट होईल असे डॉक्टरांनी सांगितले. ज्वलनशील पदार्थ पाठीवर पडला मात्र हल्लेखोराचा नेम चुकला. हे ॲसिड चेहऱ्यावर पडले असते तर चेहरा भाजून डोळा निकामी होऊ शकला असता असे डॉक्टरांनी सांगितले.
हल्लेखोराचा शोध सुरू
आमच्या कुटुंबियांचे किंवा माझ्या पतीशी कुणाशी वैमनस्य नाही. त्यामुळे हा हल्ला कुणी आणि का केला ते माहित नाही, असे जखमी आतिकच्या पत्नीने सांगितले. आम्ही गेली अनेक वर्ष या परिसरात रहात आहोत. परंतु गेल्या काही वर्षांपासून येथे बांग्लादेशातून आलेल्या घुसखोरांची संख्या वाढली आहे. त्यांनी हे कृत्य केले असण्याची शंकाही हिना खानने व्यक्त केली आहे. ॲसिड फेकण्याचा प्रकार अवघ्या काही क्षणात झाला. हल्लेखोर पळून गेला त्यामुळे तो नेमका कोण होता ते समजले नाही असे आतिक याचा भाऊ नस्तईन खान याने सांगितले. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात कलम १२४ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही हल्लेखोराचा शोध घेत असून लवकरच अटक केली जाईल, असे वांद्रे पोलिसांनी सांगितले.