मुंबई : वीस वर्षांपूर्वी म्हणजेच २००५ मध्ये गाडी उभी करण्याच्या वादातून एकाला मारहाण केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता आदित्य पांचोली याला सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. या प्रकरणी त्याला दोषी ठरवण्याचा आणि एक वर्षाची शिक्षा सुनावण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय न्यायालयाने योग्य ठरवला, मात्र चांगल्या वर्तनामुळे न्यायालयाने त्याची शिक्षा माफ केली. त्याचवेळी, तक्रारदाराला दीड लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने पांचोली याला दिले.

साधारणतः २० वर्षांपूर्वी ही घटना घडली असून आरोपी ७१ वर्षांचा आहे, शिवाय तो एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि गाडी उभी करण्यावरून झालेल्या वादातून अचानक त्याच्या हातून हे कृत्य घडले. कनिष्ठ न्यायालयाने प्रकरणाचा निकाल देताना या पैलूंचा पुरेसा विचार केलेला नाही. आरोपीने क्रूर पद्धतीने कृत्य केलेले नाही. म्हणूनच त्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेत बदल करावा, असे सांगत न्यायालयाने पांचोली याला चांगल्या वर्तनासाठी शिक्षेत माफी दिली.

कोणतीही गुन्हेगारी नसलेल्या आरोपीच्या चांगल्या वर्तनासाठी शिक्षेत सूट दिली जाते, मात्र भविष्यात त्याच्या हातून गुन्हा घडल्यास ही सूट रद्द करण्याची कायदेशीर तरतूद आहे. पांचोली याने २१ ऑगस्ट २००५ रोजी अंधेरी येथे गाडी उभ्या करण्याच्या जागेवरून प्रतीक पशीन नावाच्या व्यक्तीला मारहाण केली होती. वर्सोवा पोलिसांनी पांचोली याच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता, या मारहाणीत पशीन यांच्या नाकावर मार बसल्याने नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी २०१६ मध्ये, पांचोली याला त्याच्यावरील आरोपांत दोषी ठरवून एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. तसेच, पशीन याला २० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. या निर्णयाविरोधात पांचोली याने दिंडोशी सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. तक्रारदार आणि त्याच्या पत्नीच्या जबाबात अनेक विसंगती असून आपल्याला खोट्या आरोपात गुंतवण्यात आल्याचा दावा पांचोली याने केला होता. त्याचप्रमाणे, घटनेवेळी तेथे उपस्थित असलेल्या इमारतीच्या सुरक्षारक्षकाची किंवा इतर सदस्यांची चौकशी केली नसल्याचा दावाही पांचोली याने अपीलात केला होता.