मुंबई : मुंबईतील महत्त्वाच्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा महोत्सवांपैकी एक असलेल्या फोर्ट येथील सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या ‘मल्हार’ महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या महोत्सवाअंतर्गत शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवरील ‘सारे जहाँ से अच्छा : द सायलेंट गार्डियन’ या वेबमालिकेच्या कलाकारांसोबत विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात सहभागी होऊन प्रसिद्ध अभिनेता सनी हिंदुजा याने ‘एफटीआयआय’मधील आठवणींना उजाळा देत या ठिकाणी प्रत्येकाकडून शिकायला मिळत असल्याचा अनुभव सांगितला.

‘मल्हार’ महोत्सवाअंतर्गत ‘सारे जहाँ से अच्छा : द सायलेंट गार्डियन’ या वेबमालिकेच्या कलाकारांसोबत विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात अभिनेता प्रतीक गांधी, सनी हिंदुजा, अनुप सोनी, सुहेल नय्यर, अभिनेत्री कृतिका कामरा हे कलाकार सहभागी झाले होते. यावेळी अभिनेता सनी हिंदुजा ‘एफटीआयआय’मधील आठवणींना उजाळा देताना म्हणाला की, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) संकुलात शिक्षक व वर्गातील विद्यार्थ्यांसह प्रत्येकाकडून शिकायला मिळते आणि तुमची व्यवस्थित जडणघडण होते. प्रत्येकजण उत्साही आणि प्रत्येकाला वेगळे काही तरी करण्याची उत्सुकता असते. याप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतलेला असतो. ‘एफटीआयआय’मधील माहोलच वेगळा असतो आणि हे दिवस माझ्यासाठी खास होते.

आपण नेहमी शिकण्याच्या प्रवाहात असतो. चढ- उतार, होकार- नकार हे सर्वांच्या आयुष्याचा भाग असतात. कोणतीही गोष्ट मनापासून केली की ती चांगलीच होते, याची जाणीव मला ऑडिशनच्या काळात झाली. प्रत्येक ऑडिशन वेगळा अनुभव देणारी ठरते, असेही सनी हिंदुजा म्हणाला.

यंदा सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या ‘मल्हार’ महोत्सवाचे ४६ वे वर्ष असून ‘द वर्ल्ड विदिन’ या मध्यवर्ती संकल्पनेवर विविध स्पर्धा आधारित आहेत. साहित्य कला, ललित कला, सादरीकरण कला आणि क्रीडा विभागातील विविध स्पर्धांची मेजवानी स्पर्धकांना अनुभवायला मिळत आहे. हा आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा महोत्सव व त्यामधील विविध सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या होत्या. पावसामुळे हातात छत्री घेऊन मोठ्या संख्येने विद्यार्थी रांगेत उभे होते. एकंदरीत पावसाची पर्वा न करता विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते.