गेल्या काही दिवसांपासून आपल्या बोल्ड वेशभूषेमुळे चर्चेत आलेली मॉडेल-अभिनेत्री उर्फी जावेदनं तिच्यावर हल्ला होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. यासंदर्भात उर्फी जावेदनं राज्य महिला आयोगाला पत्र पाठवलं असून सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. चित्रा वाघ यांनी दिलेल्या धमकीचा उर्फी जावेदनं पत्रात उल्लेख केला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात ट्विटरवर माहिती दिली असून त्यावर मुंबई पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले आहेत.

रुपाली चाकणकरांची ट्विटरवर माहिती

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून उर्फी जावेदच्या पत्राविषयी माहिती दिली आहे. ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोगास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. यामध्ये अर्जदार असे नमूद करतात की,”मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे , माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे , असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी करून श्रीमती चित्रा किशोर वाघ यांनी केवळ स्वतःच्या राजकीय फायद्याकरिता किंवा वैयक्तिक प्रसिद्धीकरिता मला मारहाण करण्याच्या धमक्या प्रसारमाध्यमावरून जाहीरपणे दिल्या आहेत. सबब माझ्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे मला असुरक्षित वातावरण निर्माण होऊन मला मुक्तपणे वावरता येत नाही. म्हणून मला सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी’, असं रुपाली चाकणकरांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा – विश्लेषण: ‘नंगटपणा’ मुळे उर्फी जावेदवर कारवाई होऊ शकते? अश्लीलतेबाबत कायदा काय सांगतो?

पोलीस आयुक्तांना महिला आयोगाचे आदेश

दरम्यान, यासंदर्भात रुपाली चाकणकरांनी मुंबई पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ‘मुक्त संचाराचा हक्क घटनेने प्रत्येक भारतीयाला दिला आहे , महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर तात्काळ कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करावा’, असं चाकणकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

आणखी वाचा – हिंदू, मुस्लीम अन् आता उर्फी जावेदने शीख धर्माबद्दल केलं ट्वीट; म्हणाली, “मी धार्मिक नाही पण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रुपाली चाकणकरांनी पोलीस आयुक्तांना पाठवलेलं पत्रही या ट्वीट्ससह शेअर केलं आहे.