मुंबई विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या अदानींच्या नामफलकाला शिवसेनेने विरोध करत तोडफोड केली आहे. शिवसैनिकांनी विमानतळाबाहेर लावलेल्या नामफलकाची तोडफोड करत तिथून हटवला आहे. जीव्हीके कंपनीकडून ताबा मिळाल्यानंतर अदानी समूहाने अदानी एअरपोर्ट असे नामफलक तिथे लावले होते. त्याला शिवसैनिकांनी कडाडून विरोध केला आणि नामफलकाची तोडफोड करण्यात आली. या ठिकाणी सध्या मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या सर्व घटनेनंतर अदानी समूहाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
“आधीच्या कंपनीच्या ठिकाणी आम्ही ब्रॅन्डिंग करत आहोत आणि हे ब्रॅन्डिंग सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांच पालन करुन केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही किंवा या नावाच्या ब्रॅन्डिंगमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या निकषानुसारच या सर्व गोष्टी केल्या जातात. या ठिकाणी व्यवस्थापनाचे अधिकार असलेली आधीची कंपनी ही जीव्हीके कंपनी होती. जिथे जीव्हीकेचे ब्रॅन्डिंग होतं तिथे अदानी एअरपोर्ट ब्रॅन्डिंग करत आहे,” असे अदानी समूहाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
Maharashtra: Shiv Sena workers vandalise Adani signboard, which was placed near Chhatrapati Shivaji Maharaj International Airport in Mumbai pic.twitter.com/mzfypdwp0A
— ANI (@ANI) August 2, 2021
मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा १३ जुलैला अदानींकडे देण्यात आला आहे. यानंतर मुंबई विमानतळावर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असणाऱ्या विमानतळावर अदानींच्या नावे नामफलक लावण्यात आल्याने शिवसेनेकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर नाराजी बोलून दाखवली होती.