मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वांद्रे रेक्लेमेशन येथील २४ एकर जागेच्या पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला देण्यात आले आहे. अदानी समूहाच्या निविदेला अंतिम मंजुरी देण्यात आल्यानंतर आता पहिल्या टप्प्यात ‘एमएसआरडीसी’चे मुख्यालय पाडून तेथे उत्तुंग इमारतीच्या बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे.

वांद्रे-वरळी सागरी सेतूलगत ‘एमएसआरडीसी’ची २९ एकर जागा आहे. त्यापैकी सात एकरांवर ‘एमएसआरडीसी’चे मुख्यालय आहे. मुख्यालयालगत ‘एमएसआरडीसी’च्या मालकीची २२ एकर जागा आहे. या जागेवर सध्या कास्टींग यार्ड आहे. ‘एमएसआरडीसी’च्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करण्याकरिता वांद्रे रेक्लेमेशन येथील जागेचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पाच एकर आरक्षित जागा वगळून २४ एकर जागेच्या पुनर्विकासासाठी निविदा मागवल्या होत्या. या निविदेत अदानी समुहाने सर्वाधिक बोली लावली होती.

हेही वाचा : ठाण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान? ‘एमसीए’ची एकमेव निविदा दाखल

मंडळाच्या बैठकीत निविदेस मान्यता देण्यात आल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’तील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. निविदा अंतिम झाल्याने आता पुढील प्रक्रिया पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात ‘एमएसआरडीसी’चे मुख्यालय असलेल्या सात एकर जागेचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. पुनर्विकासाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या इमारतीमधील ५० हजार चौरस फूट क्षेत्रफळ एमएसआरडीसीला मुख्यालयासाठी मिळणार आहे.

हेही वाचा : सुट्ट्या पैशांच्या वादावर एसटीची डिजिटल पेमेंटची मात्रा, दररोज सहा हजार प्रवाशांकडून यूपीआयद्वारे तिकीट खरेदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आठ हजार कोटींचा नफा

‘एमएसआरडीसी’ला मुख्यालयाच्या जागेच्या ताबा मिळेपर्यंत अदानी समूहाकडून मासिक भाड्यापोटी दोन कोटी रुपये देण्यात येणार आहेत. या पुनर्विकासातून ‘एमएसआरडीसी’ला किमान आठ हजार कोटी रुपये नफा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.