‘आदर्श’ चौकशीचा अहवाल फेटाळण्याचा निर्णय हा राज्य मंत्रिमंडळाचा होता, असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्यावरील विरोधकांची टीका झटकून आपली प्रतिमा जपण्याचा प्रयत्न शनिवारी केला.
‘आदर्श’चा साराच घटनाक्रम हा दु:खद प्रकार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अहवालाबाबत सर्वच ज्येष्ठ मंत्र्यांशी चर्चा केली होती. पक्षातही त्यावर चर्चा झाली. अहवाल फेटाळण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आपली स्वच्छ प्रतिमा जपण्याचा गेली तीन वर्षे प्रयत्न केला आहे. मात्र ‘आदर्श’ अहवाल फेटाळण्यावरून विरोधकांनी त्यांच्या स्वच्छ प्रतिमेबद्दल विधानसभेतच प्रश्नचिन्ह निर्माण केले. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय आपल्याला घेणे भाग पडल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले.  
अशोक चव्हाण यांना वाचविण्यासाठी हे सारे करण्यात आले का, या प्रश्नावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिले.