मुंबई : वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांचे छायाचित्र खासगी मोबाईलने काढून सोयीनुसार ई-चलान जारी करणाऱ्या पोलिसांवर आता शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी परिपत्रकाद्वारे कारवाईचे आदेश दिले आहेत. वाहतूक संघटनांकडून आलेल्या तक्रारीनंतर राज्य पोलीस दलाने याबाबतचे आदेश जारी केले.
वाहतूक पोलिसांना ई-चलान यंत्रणा दिली असतानाही अनेक वाहतूक पोलीस खासगी मोबाईलवरून वाहनांचे छायाचित्र काढून ते त्यांच्या सवडीनुसार ई-चलान यंत्रणेत टाकतात. खासगी मोबाईलद्वारे एकाचवेळी मोठ्या संख्येने वाहनांचे छायाचित्र काढली जातात. याबाबत परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे वाहतूक विभागाकडून नवीन आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार वाहतूक नियमभंगाची कारवाई करताना ई-चलान यंत्रणेद्वारेच छायाचित्र पोलिसांना काढावे लागणार आहे. वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी या संदर्भात आदेश नुकताच जारी केला.
पोलिसांच्या आदेशात काय?
२ जुलैला परिवहन मंत्र्यांबरोबर विधान भवनात वाहतूक संघटनांची बैठक पार पडली. वाहतूक पोलिसांनी कारवाई करताना खासगी मोबाईलचा वापर करू नये, याबाबत यापूर्वीच सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही अनेक अधिकारी, कर्मचारी खासगी मोबाईलवर छायाचित्र काढून ई-चलाना पाठवत आहेत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याची यावी, असे वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी आदेशात नमूद केले आहे