लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणीची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे.

विद्यार्थ्यांना https://muugadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर जाऊन १० जून रोजी दुपारी १ वाजेपर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करता येणार आहे. त्यानंतर १३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल.

आणखी वाचा-अंधेरीत २९, ३० मे रोजी पाणीपुरवठा बंद, काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी संबंधित महाविद्यालयांना २५ मे ते १० जून रोजी दुपारी १ वाजेपर्यंत ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने प्रवेश अर्जाची विक्री करता येईल. तसेच विद्यार्थ्यांना २५ मे ते १० जून रोजी दुपारी १ वाजेपर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी आणि संबंधित महाविद्यालयाचा ऑनलाइन प्रवेश अर्ज (मुंबई विद्यापीठाचा प्रवेशपूर्व नोंदणी अर्जही आवश्यक) सादर करणे अनिवार्य असेल.

प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल आणि या यादीअंतर्गत संबंधित महाविद्यालयात जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी आणि शुल्क भरून प्रवेश निश्चिती (हमीपत्र अर्जासह) १४ जून ते २० जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होईल. त्यानंतर २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजता दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल आणि या यादीअंतर्गत संबंधित महाविद्यालयात जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी आणि शुल्क भरून प्रवेश निश्चिती (हमीपत्र अर्जासह) २२ जून ते २७ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होईल. तसेच २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल.

आणखी वाचा-एड्स रोखण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एआरटी केंद्र सुरू करा

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये आणि स्वायत्त महाविद्यालयांनी निर्गमित केलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी. तसेच महाविद्यालयांकडे असलेल्या प्रवेश क्षमतेनुसार, आरक्षणाचे नियम व तरतूद आणि अभ्यासक्रमांच्या पात्रतेनुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी. -डॉ. पूजा रौंदळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, मुंबई विद्यापीठ