या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

|| नमिता धुरी

योजनेंतर्गत दुर्मीळ पुस्तकांचे संवर्धन; तीन हजार पुस्तकांचे सूक्ष्म छायांकन

मुंबई : समाजाच्या वैचारिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या पुस्तकांच्या जतनाची जबाबदारी समाजानेच पेलली पाहिजे, या विचारातून एशियाटिक ग्रंथालयातर्फे  राबवल्या जाणाऱ्या ‘पुस्तक दत्तक योजनें’तर्गत आतापर्यंत सहा हजार पुस्तके  दत्तक घेण्यात आली आहेत. वाचक आणि नामांकित कंपन्यांनी दिलेल्या या प्रतिसादामुळे जुन्या आणि दुर्मीळ ग्रंथांचे संवर्धन शक्य झाले आहे.

‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’चे तत्कालीन अध्यक्ष डॉ. डी. आर. सरदेसाई यांना १९९१ साली ग्रंथालयातील जुन्या व दुर्मीळ ग्रंथांचे जतन करण्याची गरज जाणवली. त्यांनी लंडनच्या ग्रंथ संवर्धन संस्थेतील मुख्य संवर्धक फ्रे ड मार्श आणि ‘इन्टॅक’ कं पनीचे डॉ. ओ. पी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथ संवर्धन प्रयोगशाळा सुरू केली. यासाठी ‘सर दोराबजी टाटा ट्रस्ट’ने पाच लाख रुपये निधी देऊ के ला. प्रयोगशाळेसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांना लखनऊ आणि गोवा अर्काइव्ज येथे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर प्रयोगशाळेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

पुस्तक संवर्धनाची प्रक्रिया अत्यंत खर्चीक असल्याने १९९५मध्ये सोसायटीने ‘पुस्तक दत्तक योजना’ सुरू केली. या योजनेत सुरुवातीला एक हजार रुपये प्रतिपुस्तक शुल्क होते. ते आता सात हजार ५०० रुपये प्रतिपुस्तक इतके  आहे. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, मुंबई पोर्ट ट्रस्ट इत्यादी नामांकित कं पन्यांनी आणि काही वैयक्तिक वाचकांनी आतापर्यंत सहा हजार पुस्तके  दत्तक घेतली आहेत.

या सर्व पुस्तकांवर संवर्धनाची प्रक्रिया करण्यात आली असून त्यापैकी तीन हजार पुस्तकांचे सूक्ष्म छायांकनही (मायक्रोफिल्मिंग) करण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी सूक्ष्म छायांकन बंद झाले. त्याऐवजी आवश्यक तेथे संगणकीकरण (डिजिटायजेशन) करण्यास प्रारंभ झाला. मुंबईचा इतिहास, नामांकित व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग इत्यादी विषयांवर आधारित विविध भाषांतील ग्रंथांचे संवर्धन दत्तक प्रक्रियेंतर्गत शक्य झाले आहे. टाळेबंदीत छप्पराला गळती लागून पाण्यामुळे साधारण शंभराहून अधिक पुस्तके  भिजली. या पुस्तकांच्या संवर्धनासाठीही दत्तक योजनेचा फायदा होऊ शके ल.

संवर्धनाची प्रक्रिया अशी…

ज्या पुस्तकांचे कागद १८६० सालापूर्वी नैसर्गिक वस्तूंपासून तयार झालेले असतात त्यात रसायनांचा अंश नसल्याने अशी पुस्तके  अधिक काळ टिकतात. १८६० सालानंतर यंत्राद्वारे तयार झालेल्या पुस्तकांच्या कागदांमध्ये रसायनांचा वापर के ल्याने ते आम्लधारी असतात. कालानुरूप ते पिवळे पडून जीर्ण होतात. अशा पुस्तकांना संवर्धन प्रक्रियेची सर्वाधिक गरज असते. पुस्तकावर प्रक्रिया सुरू होण्याआधी त्याचे, नाव, विषय, पृष्ठसंख्या, छायाचित्र, प्रकाशक, सद्य: स्थिती यांची नोंद घेतली जाते. पाने वेगळी काढून त्यांच्या दोन्ही बाजूंना प्लास्टिकच्या जाळ्या लावून ती स्वच्छ पाण्यात २० मिनिटे ठेवली जातात. अशाच प्रकारे ही पाने अल्कलाइन द्रावणातही ठेवली जातात. आम्लाच्या प्रमाणानुसार द्रावण तयार के ले जाते. पाने वाळवून दोन्ही बाजूंना उच्च प्रतीच्या तंतूपासून तयार के लेला जपानी टीप कागद लावला जातो. त्यावर कारबॉक्सिमिथाइल सोल्युशन उकळून तयार के लेला गोंद लावला जातो. बांधणीच्या जागी कागदाच्या पट्ट्या जोडल्याने पुनर्बांधणी करताना मूळ कागदाला इजा पोहोचत नाही. प्रक्रियेनंतर पुस्तकांचे आयुष्य शेकडो वर्षांनी वाढते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adopted six thousand books from the asiatic library akp
First published on: 17-03-2021 at 00:08 IST