कराड : राष्ट्रीय खनिकर्म विकास महामंडळाने गेल्या वर्षी जवळपास ६५ हजार कोटींचा महसूल केंद्र सरकारला मिळवून दिला. लोह खनिजामध्ये खूप मोठे व व्यापक काम करणारे हे महामंडळ देशात प्रथम, तर जगात चौथ्या क्रमांकाचे संघटन असून, आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या सरकारसोबत सोने आणि पोलाद उत्पादनासाठी करार करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय खनिकर्म विकास महामंडळाचे संचालक ॲड. भरत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ॲड. पाटील म्हणाले, की राष्ट्रीय खनिकर्म विकास महामंडळाचे मुख्यालय हैदराबाद येथे असून, तेथील देशातील सर्वांत मोठ्या चाचणी प्रयोगशाळेत (टेस्टिंग लॅब) १३० शास्त्रज्ञ संशोधनाचे कार्य करतात. देशाला खनिज संपत्तीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी, या संपत्तीचे संरक्षण, वृद्धी आणि त्याचा देशाला कसा उपयोग होईल, यासाठी हे महामंडळ काम करते. अशा महत्त्वपूर्ण महामंडळाचे अध्यक्ष पंतप्रधान, तर केंद्रीय गृहमंत्री, विरोधी पक्षनेते हे सदस्य असतात. या प्रतिष्ठेच्या महामंडळावर काम करण्याची संधी मिळाल्याचे समाधान पाटील यांनी व्यक्त केले.

गडचिरोली स्टील्स सिटी बनणार

केंद्र सरकारने गडचिरोलीला ‘स्टील्स सिटी’ बनवण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यासाठी राष्ट्रीय खनिकर्म विकास महामंडळ व राज्य सरकार यांमध्ये करार करून ३० हजार कोटींची गुतंवणूक केली आहे. त्यातून सुमारे आठ ते दहा हजार लोकांना रोजगार मिळेल असा विश्वास भरत पाटील यांनी दिला.

काम करणाऱ्याला संधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना छोट्याशा डोंगरी गावातील शेतकरी कुटुंबातून मी पुढे आलेला सामान्य कार्यकर्ता. भाजपच्या युवा मोर्चाचा तालुकाध्यक्ष, भाजपचा जिल्हाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस अशा अनेक पदांवर काम करताना मला उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, आसाम, गोवा या राज्यांमध्ये निवडणुका आणि पक्ष संघटनेसाठी काम करण्याची संधी मिळाली. आणि याच माझ्या कामाची दाखल घेऊन देशाच्या महत्त्वाच्या समितीवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल भरत पाटील यांनी आपल्या पक्षाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. सातारा जिल्ह्यात आज भाजपचे दोन मंत्री, विधानसभेच्या चार मतदारसंघांचे लोकप्रतिनिधी, खासदार आहेत. सामान्यातील सामान्यापर्यंत पक्ष संघटना रुजली असून, जिल्हाभर भाजपमय वातावरण दिसत असल्याचे समाधान भरत पाटील यांनी व्यक्त केले.