मुंबई : छठ पूजेनंतर मुंबईतील अनेक जलस्रोस्तांच्या ठिकाणी कचरा पसरल्याचे निदर्शनास आले होते. मुंबईतील जुहू चौपाटीवरही कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याची ध्वनिचित्रफीत मराठी एकीकरण समितीने प्रसिद्ध केली होती. त्याबाबत समितीने महानगरपालिकेकडे तक्रार केल्यांनतर बुधवारी पालिकेने समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबवून समुद्रकिनारा स्वच्छ केला.
छठपूजेच्या धार्मिक विधींमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असल्याने अनेक पर्यावरणप्रेमींचा या पूजेला विरोध असतो. दरम्यान हा महाराष्ट्राचा सण नसल्यामुळे या पूजेला परवानगी न देण्याची मागणी यापूर्वी मराठी एकीकरण समितीने महानगरपालिका प्रशासन व पोलिसांकडे केली होती. मात्र, महानगरपालिकेतर्फे छठपूजेसाठी मुंबई शहर व उपनगरात मिळून सुमारे ६७ ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध केल्यानंतर समितीने नाराजी व्यक्त केली होती.
पालिकेने छठपूजेसाठी १४८ कृत्रिम तलाव व टाक्यांची सुविधाही उपलब्ध करण्यात आली होती. तसेच, कपडे बदलण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात ४०३ खोल्या उभारण्यात आल्या होत्या. मात्र, पालिकेच्या या सोयी सुविधांनंतर मराठी एकीकरण समितीकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. एकीकडे गणेशोत्सवात गणेशमूर्तींच्या विसर्जनाला बंदी घालून पर्यावरणाची काळजी घेत असल्याचे चित्र निर्माण केले आणि दुसरीकडे छटपूजेसाठी समुद्रकिनारे, तलाव उपलब्ध केल्याची दुटप्पी भूमिका घेतली, अशी टीका समितीने केली. छटपूजेनंतर विविध समुद्रकिनारे अस्वच्छ झाल्याच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर फिरू लागल्या आहेत. तसेच, छटपूजेदरम्यान तलावात अन्नधान्य, फळे, फुले, धूप आदी वस्तू अर्पण केल्यामुळे पाणी दूषित झाल्याचा दावा समितीने केला आहे.
